कल्याण – टिटवाळा बनेली, वैष्णव देवी माता मंदिर, बालाजी मंदिर भागातील जुन्या पायवाटा, या भागातील गृहसंकुलांचे रस्ते बंद करून बांधण्यात आलेली ६१ बेकायदा बांधकामे पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे या भागातील गृहसंकुलांमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
बनेली, बल्याणी, वैष्णव देवी माता मंदिर, बालाजी मंदिर भागात अनेक अधिकृत गृहसंकुले आहेत. या गृहसकुलांकडे जाणाऱ्या पोहच रस्त्यावर भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारणीसाठी ६१ हून अधिक बेकायदा बांधकामे उभारली होती. या बांधकामांमुळे या परिसरातील रहिवाशांना वळसा घेऊन, आपली वाहने पर्यायी मार्गाने न्यावी लागत होती.
बालाजी मंदिर, वैष्णव देवी मंदिर परिसरात भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारल्याची माहिती अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना मिळाली. या बेकायदा बांधकामांंची खात्री पटल्यावर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी तोडकाम पथक घेऊन जेसीबीच्या साहाय्याने ६१ बेकायदा बांधकामे उध्वस्त करून टाकली. पावसाळा सुरू झाला की या जागी बेकायदा चाळी उभारण्याचे नियोजन भूमाफियांनी केले होते, अशी माहिती स्थानिकांनी अधिकाऱ्यांना दिली. गेल्या दीड महिन्यांपासून साहाय्यक आयुक्त पाटील यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून बेकायदा बांधकामांच्या विरुध्द तोडफोड मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार बेकायदा चाळी, व्यापारी गाळयांची बांधकामे तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली आहेत.
या सततच्या कारवाईमुळे टिटवाळा, मांडा, बल्याणी परिसरातील बेकायदा बांधकामांची उभारणी पूर्ण ठप्प झाली आहे. अ प्रभाग हद्दीत कोठेही नवीन बेकायदा बांधकामे, निर्माणाधिन असलेल्या बेकायदा बांधकामांची माहिती मिळाली की ती अ प्रभागाकडून तात्काळ उध्दवस्त केली जात आहेत.