एकेकाळचे टुमदार गाव असलेले टिटवाळा आता कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणेच अतिशय अस्ताव्यस्तपणे वाढू लागले आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी राखून ठेवलेले आरक्षित भूखंड हडप केले जात आहेत. अनधिकृत चाळी, बेकायदा लॉजिंग, फेरीवाले यांच्या बजबजपुरीतून या उपनगराला वाचविणे आवश्यक आहे..
टिटवाळा, मांडा ही पूर्वीची गावे. श्री महागणपतीचे पवित्र स्थान म्हणून टिटवाळा प्रसिद्ध आहे. आटोपशीर वस्तीची ही गावे नागरीकरणामुळे सध्या शहराला लाजवतील अशा पद्धतीने वाढत आहेत. डोळे दिपवणारे गृह प्रकल्प टिटवाळा, मांडा भागात उभे राहत आहेत. घरांच्या वाढत्या मागणीप्रमाणे गृह प्रकल्पांची संख्या वाढत आहे. या भागातील कौलारू घरे, जुन्या वस्त्या नामशेष होऊन तेथे टोलेजंग संकुले उभी राहत आहेत. पूर्वीचे गिचमीड असलेले टिटवाळा, मांडा नवीन गृहप्रकल्प, या प्रकल्पांच्या आत-बाहेर होणारे प्रशस्त रस्ते, अत्यावश्यक नागरी सुविधांमुळे सुटेसुटे वाटू लागले आहे. हे प्रगतीचे पाऊल मात्र, अनेक स्थानिकांना पाहवत नाही, अशी परिस्थिती आहे. सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायतीचा भाग असलेली ही गावे आता १५०० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट आहेत. ज्या नागरी सुविधा कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये पालिकेकडून करण्यात येत आहेत त्याच सुविधा टिटवाळा, मांडा भागाला देण्यात येत आहेत. या भागातील रस्ते प्रशस्त, सीमेंट काँक्रीटचे करण्यात येत आहेत. उद्याने, बगीचांचे सुशोभीकरण केले जात आहे. पालिकेची अनेक नागरी सुविधांची आरक्षणे मांडा, टिटवाळा भागात आहेत. ही आरक्षणे विकसित केली तर, कल्याण-डोंबिवलीची सुंदर नगरी (स्मार्ट सिटी) होण्याअगोदर टिटवाळा शहर विकसित झालेले असेल. टिटवाळ्यात बेकायदा चाळींचे पेव फुटलेले असले तरी, अद्याप हा परिसर मोकळा श्वास घेण्यापुरता रिकामा आहे. कल्याण-डोंबिवलीसारख्या गर्दीच्या लोंढय़ांपासून टिटवाळा अद्याप मुक्त आहे. त्यामुळे या भागातील गृहसंकुलांमध्ये सदनिका खरेदीसाठी लोकांच्या रांगा असतात. मुंबईसारख्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळतील, असे श्री महागणपती सुपरस्पेशालिटी रुग्णालय टिटवाळ्यात आहे. टिटवाळ्याला काळू नदीची किनार आहे. बारमाही वाहणारी नदी हे टिटवाळ्याचे खास वैशिष्टय़ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महागणपतीचे पवित्र ठिकाण टिटवाळ्यात असल्याने राज्य, देशाच्या विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर पालिकेला अधिकाधिक महसुलाचा स्रोत देणारे टिटवाळा हे एक ठिकाण आहे. अशा या वाढत्या शहराच्या सुदृढतेची काळजी घेण्याऐवजी या शहराला पालिका प्रशासन वाऱ्यावर सोडते, की काय अशी परिस्थिती आहे.
अनैतिक धंद्यांना ऊत
टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर नक्की आपण महागणपतीच्या टिटवाळ्यातच आहोत ना, असा प्रश्न भाविकांना पडतो. उतरल्यानंतर रेल्वे स्थानकाशेजारी मासळी बाजार, विक्रीसाठी उलटय़ा टांगलेल्या कोंबडय़ा, बोकड यांचे दर्शन घडते. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे टिटवाळा रेल्वे स्थानक, मंदिर परिसरात स्थानिकांनी मोठय़ा प्रमाणात लॉजिंग सुरू केली आहेत. रिक्षाचालकाने एखादे जोडपे या लॉजमध्ये आपल्या रिक्षातून नेले की त्याला भाडय़ाबरोबर लॉजमालकाकडून गिऱ्हाईक आणून दिले म्हणून थेट दोनशे ते तीनशे रुपये मिळतात. अशा प्रकारे रिक्षाचालकाने गिऱ्हाईके आणून द्यायची आणि लॉजमालकाने पैसे कमवायचे असा छुपा धंदा या पवित्र ठिकाणी राजरोस सुरू आहे. स्थानिक जुन्याजाणत्यांना हे पटत नाही, पण बोलणार कोणाला असाही प्रश्न आहे. स्थानिकांची दहशत असल्याने सगळा चिडीचूप कारभार. पोलिसांना हे कळत नाही असे नाही, तरीही ते डोळेझाक करतात. कधी तरी देखावा करण्यासाठी एखादी फुसकी कारवाई लॉजमालकावर करायची आणि खूप मोठे काही केल्याचा देखावा उभा करायची ही येथील स्थानिक पोलिसांची पद्धत आहे.
या दुकानदारीनंतर टिटवाळा पूर्व रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांनी पूर्ण विळखा घातला आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध प्रकारच्या वस्तू विकणारे परप्रांतीय फेरीवाले, त्यात आजूबाजूच्या गावांमधून भाजीपाला विक्रीसाठी येणारे विक्रेते असा सगळा विक्रेत्यांचा बाजार भर रस्त्यात, पदपथांवर भरतो. रेल्वे स्थानक भागातून टिटवाळा गणपती मंदिराकडे जायचे म्हणजे यापूर्वी गुहेतून जातो की काय असा भास व्हायचा, असे चिंचोळे रस्ते या भागात पाहायला मिळत होते. रेल्वे स्थानक ते गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता सीमेंट काँक्रिटचा करण्यात आल्याने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. चिंचोळा असणारा हा रस्ता प्रशस्त झाला आहे. सुरुवातीला हे प्रशस्त रस्ते पाहून टिटवाळ्यातील रहिवासी फेरीवाले, विक्रेत्यांच्या कोंडीतून सुटका झाली म्हणून दीर्घ श्वास सोडत होते. पण घडले भलतेच. याऊलट रस्ते प्रशस्त झाल्यानंतर पालिकेचा रस्ता ज्या भागातून गेला आहे, त्या भागातील प्रत्येक इंच जमीन कशी आपल्या मालकीची आहे, असा दावा करण्यासाठी टिटवाळ्यात स्पर्धा लागली आहे. स्थानिक माफिया, गावगुंड, भाई, दादा असे सगळे टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील जमिनीशी काडीचा संबंध नसताना एखाद्या वतनदारासारखे ती जमीन कशी आपल्या मालकीची आहे, असे भासवत फेरीवाल्यांकडून धंदे लावण्यासाठी, हातगाडय़ा उभ्या करण्यासाठी पैसे उकळत आहेत. रस्त्यांच्या कडेला ज्या मालकांच्या इमारती आहेत ते मालक, या इमारतींमधील गाळेधारक फेरीवाल्यांकडून जागेच्या मगदुराप्रमाणे १० हजारांपासून ते २० हजारांपर्यंत हप्ते घेत आहेत. अशी सध्याची टिटवाळ्यातील परिस्थिती आहे. महापालिकेने शहरवासीयांना, येणाऱ्या भाविकांना विनाअडथळा मंदिरापर्यंत जाता यावे, या उद्देशाने प्राधान्याने टिटवाळा रेल्वे स्थानक भागात सीमेंट रस्त्यांना प्राधान्य दिले. पण त्याचा गैरफायदा पूर्णपणे स्थानिक दादांनी उचलला आहे. पैसे देऊन विनाअडथळा दिवसभर धंदा करण्यास मिळत असल्याने फेरीवाले दादा कंपनीला पैसे देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. फेरीवाल्यांच्या दररोजच्या बाजारामुळे येणारे भाविक, स्थानिक हैराण आहेत. टिटवाळा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी बस, खासगी जीप यांची रेल्वे स्थानक भागात वर्दळ असते. त्यात फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक, रस्ता प्रशस्त झाल्यानंतर कोपऱ्यावर उभ्या करण्यात आलेल्या टपऱ्यांमुळे वाहनतळांपर्यंत जाणे प्रवाशांना नकोसे होते. इतकी बजबजपुरी टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात झाली आहे.
अशा प्रकारची येथील अव्यवस्था मोडून काढणे हे पालिकेच्या ‘अ’ प्रभागातील स्थानिक अधिकाऱ्यांचे काम आहे. टिटवाळा प्रभागासाठी स्वतंत्र प्रभाग क्षेत्र अधिकारी, फेरीवाला हटाव पथक, अतिक्रमणविरोधी पथक तैनात आहेत. अशी ही पालिकेची व्यवस्था असताना शहरवासीयांना मात्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. स्थानिक पालिका अधिकारी फेरीवाले, स्थानिक गावदादा यांच्याशी संगनमत करून असतात. फेरीवाल्यांवर कारवाई झाली तर दादांना फुकटचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे दादांची पालिका कर्मचाऱ्यांना दादागिरी, त्यात कारवाई झाली तर दरमहा फेरीवाल्यांकडून जे काही ‘लक्ष्मीदर्शन’ होते ते बंद होण्याची भीती. अशा दुहेरी कात्रीत पालिका कर्मचारी असतो. आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या विकास आराखडय़ातील आरक्षणात टिटवाळ्यातील सोयीसुविधांचा उल्लेख आहे. नियमीत नागरी सुविधांबरोबर टिटवाळ्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव आहे. शहराला चोवीस तास अखंड वीजपुरवठा होईल, यासाठी महावितरणसाठी उपकर्षण केंद्राचे आरक्षण आहे. अशी सोयीसुविधांची आरक्षणे भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून गिळंकृत केली आहेत.
महापालिकेने आमच्या जमिनींवर आरक्षणे टाकली आहेत. पण त्या जमिनींचा टीडीआर देण्यास टाळाटाळ केली जाते. मग, आम्ही किती दिवस आमच्या जमिनी पालिकेच्या दावणीला ठेवायचा, असा येथील जमीनमालकांचा प्रश्न आहे. पालिकेच्या नगररचना विभागातील सक्रिय कर्मचाऱ्यांना इमारत तेथे सदनिका आणि बांधकाम तेथे भागीदारीत हिस्सा मिळाला तरच ते प्रकरणांच्या नस्ती पुढे पाठवतात. अशा नस्तीच्या मस्तीत असलेल्या नगररचनेतील कर्मचाऱ्यांना शहर विकासाचे काही देणेघेणे नसल्याने टिटवाळ्यासारखे मोकळे शहर विविध समस्यांनी गांजलेले आहे. विकासाच्या वाटेवर असणाऱ्या या शहरातील फेरीवाले, बेकायदा बांधकामे, लॉजिंगसारखी दलदल थांबविण्यासाठी संकटमोचक गणरायाने येथील व्यवस्थेला बुद्धी द्यावी. अन्यथा, पालिकेकडून नागरी सुविधांचा टिटवाळ्यात पाऊस पाडला जाईल, पण स्थानिक लोकप्रतिनिधी, माफिया, दादांच्या वतनदारीने शहराचे रूपडे काळवंडलेलेच राहील.
अनधिकृत चाळींचा शाप
अनधिकृत चाळी हा तर टिटवाळा, मांडा शहराला मिळालेला शाप. बाराही महिने तिन्ही त्रिकाळ मिळेल त्या ठिकाणी भूमाफियांकडून बेकायदा चाळी उभारण्यात येत असल्याने टिटवाळ्याचे निसर्गरम्य रूप या माफियांनी ओबडधोबड करुन टाकले आहे. बांधकामासाठी अख्खी टेकडी गिळंकृत करू शकतात, अशी राक्षसी ताकद या माफियांमध्ये आहे. त्यामुळे टेकडीवर जमीन असलेला जागामालक आपल्या हक्काच्या जागेवर जाण्यासाठी घाबरतो. टिटवाळ्याजवळील बल्याणी येथे हा प्रकार पाहण्यास मिळतो.