सध्या शहर म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा पूर्वी एक छोटेसे गाव होते. टिटवाळ्यामध्ये असणारे गणपती मंदिर एवढीच या गावाची ओळख होती. कालांतराने गावात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती अस्तित्वात यायला लागली आणि सोयीसुविधांनी सुसज्ज असे टिटवाळ्याचे शहरात रूपांतर झाले. शहर केवळ भौतिक सोयीसुविधांनी सुसज्ज असून चालणार नव्हते. शहराची विविध उपक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक ओळख होणे गरजेचे होते. त्यासाठी श्रीकांत देवधर, सुभाष जोशी, महेश्वर धाक्रस, चिंतामणी कुलकर्णी, विवेक पुराणिक, प्रवीण पंडित या कला आणि साहित्याची आवड असणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन जनप्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. १९९१ मध्ये दाजी पणशीकरांची महाभारताची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत होती. या व्याख्यानमालेला येणाऱ्या परिसरातील सुजाण नागरिकांनी ग्रंथालयाची मागणी केली. नागरिकांच्या मागणीवरून २ ऑगस्ट १९९२ रोजी जनप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून पं. वासुदेवशास्त्री पणशीकर सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना झाली. या ग्रंथालयाच्या माध्यमातून टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभव निर्माण झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा