रस्ता रुंदीकरण, प्रशस्त सिमेंट रस्त्यांमुळे चकचकीत झालेला टिटवाळा पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी काबीज करून ठेवला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले असून, पादचाऱ्यांना ये-जा करणे शक्य होत नाही. विविध भागांतून शेकडो भाविक दररोज टिटवाळाच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात, त्यांना या अडथळ्यांचा सर्वाधिक सामना करावा लागतो.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अखत्यारीत टिटवाळा, मांडा भाग आहे. टिटवाळा पूर्व भागातील रस्ता रुंदीकरण केलेले सिमेंट रस्ते, पदपथ, इमारतींसमोरील मोकळ्या जागा फेरीवाल्यांनी काबीज केल्या आहेत. परप्रांतीय फेरीवाल्यांची घुसखोरी टिटवाळ्यात सर्वाधिक वाढली आहे. पालिकेच्या टिटवाळा येथील प्रभाग कार्यालयात फेरीवाल्यांना हटविण्यासाठी फेरीवाला हटाव पथक आहे. पण टिटवाळ्यातील रहिवासी या पथकाला पालिकेचे ‘हप्ता पथक’ असे संबोधत आहे. या पथकातील काही कर्मचाऱ्यांचे फेरीवाल्यांशी वर्षांनुवर्ष स्नेहाचे संबंध आहेत. दर महिन्याला फेरीवाल्यांकडून फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचे लक्ष्मीपूजन केले जाते, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
याशिवाय घरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, रेनकोट, दप्तरे फेरीवाल्यांकडून कर्मचाऱ्यांना फुकट मिळतात. फेरीवाल्यांकडून सर्व प्रकारचे ‘समाधान’ कर्मचाऱ्यांचे करण्यात येते. त्यामुळे फक्त कारवाई केली हे प्रशासनाला दाखविण्यासाठी फेरीवाला हटाव पथकाचे वाहन टिटवाळा रेल्वे स्थानक भागात फिरवले जाते. प्रत्यक्षात पथकाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. यापूर्वी पालिका
मुख्यालयात मालमत्ता विभागात सर्वप्रकारच्या उलथापालथी करणारा एक उचापती कर्मचारी टिटवाळा प्रभाग कार्यालयात कार्यरत आहे आणि हा कर्मचारी अनधिकृत बांधकामे, फेरीवाला यामधील सगळे व्यवहार पाहत असल्याचे टिटवाळ्यातील एका जाणकाराने सांगितले. याशिवाय आयुक्तांच्या मर्जीतील एका दुय्यम अधिकाऱ्याला टिटवाळ्यात प्रभाग अधिकारी म्हणून नेमण्यात आला आहे. त्यामुळे टिटवाळ्यात सध्या आनंदीआनंद असल्याची टीका होत आहे.
बुधवारचा अनधिकृत बाजार
टिटवाळा परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा चाळी भूमाफियांनी उभारल्या आहेत. या लोकांच्या गरजा ओळखून फेरीवाल्यांकडून दर बुधवारी टिटवाळा रेल्वे स्थानक भागात बाजार भरविला जातो. सकाळपासून सुरू होणारा हा अनधिकृत बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. ज्या रहिवाशांना, भाविकांना टिटवाळ्यातील बुधवारच्या बाजाराची माहिती असते, ते या दिवशी टिटवाळ्याकडे फिरकत नाहीत किंवा रहिवासी इमारतीमधून खाली उतरत नाहीत. इतकी गर्दी या फेरीवाल्यांनी मुख्य रस्ते, पदपथांवर केलेली असते.
आयुक्त ई. रवींद्रन यांनी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यासाठी ज्या जिद्दीने पुढाकार घेतला, त्याच जिद्दीने आयुक्तांनी टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
-केशव पाठक, रहिवासी