गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन; स्वच्छ भारत अभियानातून मंदिर व्यवस्थापनाचा पुढाकार
टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिरात तयार होणारे दैनंदिन निर्माल्य, तसेच मंदिर परिसरातील फूल विक्रेत्यांजवळील टाकाऊ फुले एकत्रित करून, निर्माल्याची मंदिर परिसरात विल्हेवाट लावण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून मंदिर व्यवस्थापनाने हा प्रकल्प उभारण्याला अधिक प्राधान्य दिले.
गणेश मंदिरात तयार होणाऱ्या निर्माल्याची व्यवस्थापनातर्फे अनेक वर्षांपासून योग्य विल्हेवाट लावण्यात येत होती. फुले, पाने, सूत एकत्र असलेले फुलांचे हार, वेण्या नाशवंत झाल्यावर, त्याची अन्यत्र विल्हेवाट लावण्यापेक्षा या नाशवंत निर्माल्यावर प्रक्रिया केली तर त्यापासून चांगले खत तयार होईल, असा विचार मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आला. मंदिर परिसरात नियमित स्वच्छता राखली जाते; परंतु स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून गणेश मंदिर संस्थानने मंदिर परिसरात गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
मंदिरातून दररोज निर्माल्य तयार होते. फूल विक्रेत्यांकडील फुले, हारांचाही रात्री उशिरा कचरा होतो. आता गांडूळ खत प्रकल्पासाठी ते वापरले जाणार आहे. फूल विक्रेत्यांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
डोंबिवलीतील प्रसिद्ध वास्तुविशारद लक्ष्मण पाध्ये गेली चाळीस वर्षे टिटवाळा येथे महागणपतीच्या दर्शनासाठी जातात. मंदिर व्यवस्थापन निर्माल्यावर प्रक्रिया करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प उभारत असल्याची माहिती पाध्ये यांना मिळाली. या प्रकल्पाबाबत पाध्ये यांनी महागणपती मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांच्याशी संपर्क केला. स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे जोशी यांनी पाध्ये यांना सांगितले. मंदिर हा अभिनव उपक्रम राबवीत असल्याबद्दल लक्ष्मण पाध्ये यांनी आपली पत्नी ज्योती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख रुपये या प्रकल्पाला दिले.
परिसरातील उद्यानांसाठी खत
मंदिर परिसरात नेहमीच स्वच्छता असते; परंतु गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला तर निर्माल्यापासून खतनिर्मिती होईल. मंदिर परिसरातील निर्माल्य, कचरा परिसरात विघटित केला जाईल. या खताचा वापर परिसरातील उद्याने, बगीचे, मंदिर परिसरातील झाडांसाठी होईल. तसेच घरगुती बागेसाठीही त्याचा वापर करता येईल. पुणे येथील निर्मला कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
कडोंमपाचे सहकार्य
कल्याण डोंबिवली पालिकेने या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य देण्याची तयारी दाखविली आहे. मंदिर परिसरात तयार होणारा ओला, सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्यात येणार आहे. कचरावेचक महिलांना ओळखपत्र देऊन त्यांना नियमितपणे या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. टिटवाळा परिसरातील हॉटेलचालकांनी रस्त्यावर नाशवंत अन्न टाकू नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. गावातील झाडांचा पालापाचोळा, व्यापाऱ्यांकडे तयार होणारा कचरा साठवणुकीसाठी पालिकेतर्फे कचरा डब्बे देण्यात आले आहेत. हे डब्बे पालिका कर्मचारी नियमित उचलणार आहेत. टिटवाळा परिसर स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे साहाय्यक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले. गांडूळ खत प्रकल्प उद्घाटनाच्या वेळी नगरसेवक संतोष तरे, पुष्प सेवा समितीचे अध्यक्ष मोरेश्वर तरे, प्रभाग अधिकारी लहू वाघमारे, समन्वयक सुहास गुप्ते उपस्थित होते.