ठाणे महापालिका हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी अर्थसंकल्पात उपायांची मोठी जंत्री मांडणाऱ्या महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून दिवा कचराभूमीला लागलेल्या आगीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. या कचराभूमीवर जवळपास दररोज आग लागत असून धूर आणि उग्र दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे, डायघर भागातही कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने स्वच्छ ठाण्याच्या घोषणेचे तीनतेरा वाजले आहेत.
कल्याण येथील आधारवाडी भागातील कचराभूमी हटवावी यासाठी स्थानिक रहिवाशांनी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. दिव्यातही नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही हा प्रश्न सुटत नसल्याने रहिवासी आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिवा कचराभूमीला दररोज सायंकाळी आग लागते. सुकलेल्या कचऱ्यामुळे ही आग लगेच उग्र रूप धारण करते व त्यातून निघणारा धूर संपूर्ण परिसरात पसरतो. कचराभूमीपासून जवळच असलेल्या कोपर स्थानक, पलावा, शीळ, दिवा- मानपाडा रस्ता येथील वायुप्रदूषणात त्यामुळे प्रचंड वाढ झाली आहे. पेटत्या कचऱ्यातून निर्माण होणारे विषारी वायू श्वसनासाठी घातक असून यामुळे डोळ्यांची जळजळ, फुप्फुसाचे त्रास, घसा सुजणे, कान दुखणे, सर्दी, खोकला आदी त्रास नागरिकांना होत आहेत. त्यामुळे येथे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे, अशी माहिती स्थानिक डॉक्टर अमर कोकीटकर यांनी दिली. ठाणे शहारातून दररोज गोळा होणारा ७०० मेट्रिक टन कचरा दिवा कचराभूमीवर टाकण्यात येतो. विशेष म्हणजे ही कचराभूमी अनधिकृत असून असे असताना दररोज या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आणून टाकले जात आहेत, असे दिवावासीय असणारे विजय भोईर यांनी सांगितले. दिव्यात लागणाऱ्या कचऱ्याच्या आगीमुळे दिवावासीयांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून उद्रेकापूर्वीच महापालिका प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘दिवा विकासकांचा व्हावा’
दिवा कचराभूमीमुळे या संपूर्ण परिसराला अवकळा आली असताना गेल्या काही महिन्यांपासून दिवा, शीळ, डायघर भागातील कचरा सफाई आणि वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. येथील नाले, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसत असून वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कल्याण-डोंबिवली हद्दीत पलावा आणि कल्याण-शीळ मार्गावर बिल्डरांच्या काही वसाहती उभ्या राहात असल्याने गेल्या काही वर्षांत या भागात सुविधांची रेलचेल सुरू झाली आहे. मात्र, घोडबंदरप्रमाणे आमचा दिवा, डायघर जेव्हा बिल्डरांचा होईल तेव्हा इथला कचरा प्रश्न चुटकीसारखा सुटेल, अशी खोचक प्रतिक्रिया या भागातील रहिवासी भास्कर िशदे यांनी दिली.