– नव्याने रुजू झालेले तुषार पवार यांच्याकडे घनकचरा विभागाची जबाबदारी
ठाणे : शहर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घनकचरा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असतानाच, त्यांनी बुधवारी उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून घनकचरा विभागाचा पदभार काढून तो नव्याने रुजू झालेले तुषार पवार यांच्याकडे दिला आहे. उपायुक्त पवार यांनी यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत घनकचरा विभागाची जबाबदारी सांभाळली असून यामुळेच बांगर यांनी त्यांना ठाणे महापालिकेत आणून त्यांच्या खांद्यावर घनकचरा विभागाची जबाबदारी दिल्याचे सूत्रांकडून समजते. या निमित्ताने बांगर यांनी शहराचा विकास करण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांची मोट बांधण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>> ठाणे : अतिक्रमणावरील कारवाई टाळण्यासाठी महापालिकेच्या सफाई कामगाराने मागितली लाच
तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी उपायुक्त मनिष जोशी यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी दिली होती. घनकचरा व्यवस्थापन व्यतिरिक्त त्यांच्याकडे सचिव, आरोग्य आणि जकात एल बी टी हे देखील विभाग होते. दरम्यान, आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची बदली होऊन त्यांच्या जागी अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शहर स्वच्छतेबरोबरच सौंदर्यीकरणाला महत्व देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी शहरात दौरा करून या कामांची पाहणी केली होती. त्यात त्यांनी दोन सार्वजनिक स्वच्छता गृहाची साफसफाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. रस्त्यावर कचरा दिसणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते. तरीही शहराच्या साफसफाई मध्ये दिरंगाई होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यातूनच त्यांनी शहर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून घनकचरा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाच त्यांनी बुधवारी उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून घनकचरा विभागाचा पदभार काढून तो नव्याने रुजू झालेले तुषार पवार यांच्याकडे दिला आहे.
उपायुक्त तुषार पवार हे आयुक्त अभिजित बांगर यांचे निकटवर्तीय असल्याचे सूत्रांकडून समजते. उपायुक्त पवार यांनी यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत घनकचरा विभागाची जबाबदारी सांभाळली असून त्यावेळी नवी मुंबई महापालिकेत रामस्वामी हे आयुक्त होते. रामस्वामी यांच्या बदलीनंतर पवार यांची मंत्रालयात बदली झाली होती. रामस्वामी आणि आयुक्त बांगर यांचे गुरुशिष्यासारखे नाते असल्याचे बोलले जात असून त्यामुळेच आयुक्त बांगर यांनी त्यांच्याशी चर्चा करून पवार यांची निवड केली. नवी मुंबई महापालिके सारखे ठाणे शहर करायचे असेल तर त्यासाठी चांगली आणि अनुभवी टीम हवी, असे त्यांनी पवार यांची ठाणे महापालिकेत नियुक्ती करण्यास सांगितले होते. राज्य सरकारने त्यांची ही मागणी मान्य करत पवार यांची ठाणे महापालिकेत नियुक्ती केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.