‘मी आयुक्तपदी असेपर्यंत बाजार भरू देऊ नका’ : महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दम
मुंब्रा रेल्वे स्थानक ते वाय जंक्शनपर्यंत चार किलोमीटर अंतराच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा ठेले मांडत मुंब्य्रातील मुजोरी आणि सर्वसामान्यांच्या अडवणुकीचे प्रतीक मानले जाणारे गुलाब मार्केट ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रडारवर आले आहे. याच परिसरातील सुमारे दोन हजार अतिक्रमणांवर हातोडा चालवूनही जयस्वाल यांची पाठ वळताच मुंब्य्राचा सायंकाळचा गुलाब बाजार पुन्हा एकदा भरू लागल्याने अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारीही चक्रावून गेले आहेत. त्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी ‘मी जोपर्यंत ठाण्यात आयुक्त म्हणून आहे, तोपर्यंत गुलाब बाजार भरता कामा नये’, असा सज्जड दम अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने गेल्या चार दिवसात मुंब्य्रातील सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक बांधकामे आणि अतिक्रमणे जमिनदोस्त केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका बडय़ा पदाधिकाऱ्याचे हॉटेलही अधिकाऱ्यांनी पाडले. ही कारवाई सुरू असताना आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दिशेने काही अतिक्रमणधारकांनी दगड भिरकावल्याने वातावरण तंग बनले होते. तरीही गेल्या चार दिवसांपासून मुंब्रा परिसरात महापालिकेची मोहीम सतत सुरू आहे.
आर.ए.राजीव यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाची सूत्रे असताना त्यांनी गुलाब बाजारावर मोठी कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवस हा रस्ता सुटसुटीत भासू लागला होता. कपडे, खाद्य विक्रेत्यांची मोठी रेलचेल असणाऱ्या या बाजाराला वर्षांनुवर्षे स्थानिक राजकीय नेते, गावगुंडांचा आर्शीवाद लाभला आहे. त्यामुळे या बाजारावर कारवाई करण्याची िहमत फारशी कुणी दाखवीत नाही. राजीव यांच्या दणक्यानंतरही हा बाजार पूर्ववत झाला. चार दिवसांपासून सुरू असलेल्या महापालिकेच्या कारवाईला वाकुल्या दाखवत सायंकाळी आठनंतर गुलाब बाजार नित्यनेमाने भरलेला पाहून आयुक्त संजीव जयस्वाल कमालीचे संतापले असल्याचे वृत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत बेकायदा गुलाब बाजाराचे प्रस्थ धुळीस मिळविण्याचे आदेश त्यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ‘मी असेपर्यंत गुलाब बाजार भरता कामा नये’, अशा शब्दात जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावल्याचे वृत्त आहे. तसेच रोज सायंकाळी काम आटोपल्यानंतर मुंब्य्राच्या मुख्य रस्त्याची जातीने पाहणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा