ठाणे : महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे १ सप्टेंबरला बंद करून पालिका हद्दीतील डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पंचक्रोशी संघर्ष समितीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी डायघर परिसरात घेतलेल्या बैठकीत स्थानिकांनी डायघर कचरा प्रकल्पास एकमुखाने विरोध दर्शविला आहे. यामुळे पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला असून त्याचबरोबर ठाणेकरांची कचराकोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>> शासकीय रूग्णालयात रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार; उल्हासनगरातील प्रकार
दिवा येथील कचराभूमीला स्थानिकांचा विरोध होता. यामुळे पालिकेने हा प्रकल्प बंद केला. डायघर येथे कचरा प्रकल्प उभारणीचे काम पालिकेमार्फत सुरू आहे. या प्रकल्पात कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम पुर्ण होईपर्यंत प्रशासनाने महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरूपात कचरा प्रकल्पाची उभारणी केली. वर्षभरासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता. परंतु दिड वर्षे झाले तरी डायघर प्रकल्पाचे काम पुर्ण झाले नसल्यामुळे भंडार्ली कचरा प्रकल्प सुरुच आहे. या प्रकल्पात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. कचऱ्यामुळे शेतीचे नुकसान होण्याबरोबरच शेततळे आणि कुपनलिकांमधील पाणी दुषित झाले आहे. या प्रकल्पांच्या बदल्यात १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याच्या आश्वासनाची राज्य सरकारने पुर्तता केलेली नाही. या कारणस्तव मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह स्थानिकांनी हा प्रकल्प बंद पाडून आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भंडार्ली कचरा प्रकल्प १५ सप्टेंबरच्या आधी बंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले होते.
हेही वाचा >>> डोंबिवलीत शिक्षिकेच्या घरी इतक्या लाखांची चोरी
भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प १ सप्टेंबरला बंद करून पालिका हद्दीतील डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. परंतु डायघर प्रकल्पास स्थानिकांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प अडचणीत आला आहे. शीळ, डायघर, पडले, देसाई, खिडकाळी आणि नवी मुंबईतील उत्तरशीव या गावातील रहिवाशांचा प्रकल्पाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर पंचक्रोशी संघर्ष समितीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी डायघर परिसरातील दत्तमंदीरात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, माजी नगरसेवक संतोष केणे, बाबाजी पाटील, हिरा पाटील, मनसे विभाग अध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादी कल्याण जिल्हा तालुका अध्यक्ष मधुकर माळी, समाज सेवक शिवाजी माळी यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डायघर कचरा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचा नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोणताही कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित होत नाही. परिणामी, शहरातील कचराभूमी डोंगराप्रमाणे वाढत आहे. त्याविरुद्ध नागरिक न्यायालयात धाव घेत आहेत. ज्या ठिकाणी कचरा प्रकल्प राबविला जातो, तिथे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रत्येक गावा-गावात बैठका घेऊन विरोध करण्याचे बैठकीत ठरले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.