ठाणे : हवा प्रदूषण प्रकरणी १०२ जणांना पालिकेने नोटिसा बजावल्या असून शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या १ डम्परवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. यासह इतर कारवाईत पालिकेने ६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावरुन एकूण १६ टन माती संकलीत करण्याबरोबरच रस्ते पाण्याने धुण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवलीत विदेशी चलनाच्या माध्यमातून महिलांकडून चालकाची फसवणूक
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे आखून देत त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी भरारी पथके तयार केली आहेत. या पथकाकडून हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत असलेले व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. हवा प्रदूषण प्रकरणी १०२ जणांना पालिकेने बुधवारी नोटिसा बजावल्या असून भरारी पथकाने १२ ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या १ डम्परवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. यासह इतर कारवाईत पालिकेने ६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावरुन एकूण १६ टन माती संकलीत केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने एकूण १६ वाहनांचा वापर करुन ४.४१ कि.मीचे रस्ते पाण्याने धुतले.