एप्रिलमध्ये कारवाईचा धडाका; ५० हजार दुकानदारांना नोटिसा पाठविण्याची ठाणे महापालिकेची तयारी
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या बेकायदा बांधकामांवर हातोडा फिरवल्यानंतर ठाणे महापालिकेने इमारतीची सीमारेषा आणि रस्त्यादरम्यान येत असलेल्या जागेत वाढीव बांधकाम करणाऱ्या सुमारे ५० हजारांहून अधिक व्यापाऱ्यांना येत्या काही दिवसात नोटिसा बजाविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बांधकामे स्वेच्छेने काढा अन्यथा कारवाईला तयार राहा, असा इशारा महापालिकेने यापूर्वीच दिला आहे. या पाश्र्वभूमीवर मार्जिनल जागेत दुकान थाटून दुप्पट कमाई करू पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना धक्का बसणार असून, येत्या १० ते १५ एप्रिलपासून संपूर्ण शहरभर यासंबंधीची धडक कारवाई सुरू करण्याचे नियोजन महापालिका वर्तुळात आखले जात आहे.
ठाणे शहरातील विविध भागांमध्ये रस्ता रुंदीकरणात अडथळा उभा राहील अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आल्याचे अगदी सर्रासपणे दिसून येते. महापालिकेच्या परवानगीने उभारण्यात आलेल्या इमारतींमध्येही मार्जिनल जागेत जागोजागी असे बांधकाम करण्यात आले आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील दुकाने आणि मूळ रस्त्यामधील मोकळ्या जागेत कोणतेही बांधकाम करण्यास विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार मज्जाव आहे. ही जागा साधारणपणे नियमित व्यवहारासाठी इमारतीत येणाऱ्या पादचाऱ्यांना वावरण्यासाठी मोकळी असावी, असे गृहीत धरण्यात आले आहे. असे असताना ठाणेच नव्हे तर मुंबई आणि आसपासच्या सर्वच महानगरांमध्ये मार्जिनल जागेचा वापर व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर पद्धतीने होत असल्याचे दिसून आले आहे.
सर्वच रस्त्यांवर बांधकाम
मार्जिनल जागेत वाढीव बांधकाम करून जादा कमाई करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसून येतो. ठाण्यातील गोखले मार्ग, राम मारुती रोड, हरि निवास सर्कल, पाचपाखाडी, रेल्वे स्थानक रोड, वर्तकनगर अशा परिसरात मार्जिनल जागेचा गैरवापर सुरू असल्याची शेकडो उदाहरणे सहज सापडतील. महापालिकेने विकास आराखडय़ात निश्चित केल्याप्रमाणे शहरातील विविध रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रुंदीकरणानिमित्ताने मार्जिनल जागांचा सुरू असलेला हा गैरवापर ठसठशीतपणे पुढे आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा