ठाणे : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने उन्हाचे चटके बसू लागले असून त्यापासून ठाणेकरांचा बचाव करण्यासाठी ठाणे महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असलेल्या शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तीन हात नाका चौकातील मार्गिकेवर प्रायोगिक तत्वावर जाळीचे आच्छादन टाकले आहे. आणखी काही ठिकाणी अशाप्रकारे जाळी उभारण्याचा मानस असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होते तर, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. या वातारणीय बदलांमुळे ओढावलेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी सुसज्ज राहणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पालिकेकडून करण्यात येत आहे. याशिवाय, वाईट परिणामांची तीव्रता रोखण्यासाठी महापालिकेने सीईईडब्ल्यु या संस्थेमार्फत उष्णता कृती आराखडा, पुरपरिस्थिती कृती योजना, सांडपाणी पुनर्वापर, हवा गुणवत्ता निर्णय प्रणाली तयार केली आहे.

त्यानुसार पालिकेकडून उन्हाळ्यात रहदारीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, प्रभागांमध्ये थंड निवारा केंद्र, अशा उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचपाठोपाठ पालिकेने आता सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असलेल्या शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तीन हात नाका चौकातील मार्गिकेवर प्रायोगिक तत्वावर जाळीचे आच्छादन टाकले आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी ठाणे महापालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर गोखले रोड वरून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोखले रोड वरील ही जाळी १०० फूट लांब, २५ फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून २० फूट एवढी आहे. या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. आणखी काही ठिकाणी अशाप्रकारे जाळी उभारण्याचा मानस असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

Story img Loader