आयआयटी, आयआयएम तसेच रसायन तंत्रज्ञान संस्थेसारख्या मोठय़ा शासकीय शिक्षण संस्थांसाठी ठाणे शहराची कवाडे खुली व्हावीत यासाठी ठाणे महापालिकेने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून कल्याण-शीळ मार्गालगत असलेल्या खिडकाळी परिसरातील सुमारे ३५० एकर क्षेत्रफळाची भली मोठी जमीन यापुढे शैक्षणिक प्रयोजनासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारमार्फत चालवण्यात येणाऱ्या शिक्षणसंस्थांनाच येथे परवानगी देण्यात येणार असल्याचे समजते.
ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात यापूर्वी ही जागा हरित विभाग तसेच क्रीडा संकुलासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र, हे आरक्षण बदलून यापुढे शैक्षणिक प्रयोजनासाठी या जागेचा वापर करण्याचा प्रस्ताव आला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
यापूर्वी आयआयटी तसेच रसायन शिक्षण संस्थेने ठाण्यात संकुल सुरू करण्याची इच्छा ठाणे महापालिकेकडे प्रदर्शित केली आहे. मुंबईलगत असलेली एखादी मोठी जागा उपलब्ध झाल्यास केंद्र सरकारच्या धोरणानुसार या शहरात संकुल थाटले जाऊ शकते, असा प्रस्ताव या संस्थांनी ठाणे महापालिकेकडे सादर केला आहे. रसायन तंत्रज्ञान संस्थेने ठाणे शहरात सुमारे १०० हेक्टर जमिनीची मागणी महापालिकेकडे केली आहे. आयआयटीसारख्या मोठय़ा शासकीय शिक्षण संस्थांचे जाळे शहरात उभे राहू शकले तर ठाणे शहराचा शैक्षणिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असा महापालिकेचा दावा आहे. हे लक्षात घेऊन खिडकाळी भागातील सुमारे ३५० एकरांची विस्तीर्ण जमीन शासकीय शिक्षण प्रयोजनासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय शहर विकास विभागाने घेतला आहे. खिडकाळी येथील ही जमीन हिरवा पट्टा म्हणून आरक्षित असली तरी कमी चटईक्षेत्र निर्देशांक देत या ठिकाणी शिक्षण संस्थेची उभारणी करणे शक्य आहे, अशी माहिती शहर विकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. आयआयटीने पवई येथील संकुलात निसर्गाची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यामुळे शासकीय संस्थांसाठी या पट्टय़ाचे आरक्षण केल्यास येथील निसर्गाला धक्का पोहचणार नाही, याची काळजीही घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
जयेश सामंत, ठाणे

Story img Loader