नालेसफाईची कामे कामे ३१ मेपर्यंत ९० टक्के आणि ७ जूनपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याचे मान्सूनपूर्व आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीत आयुक्तांचे आदेश
पावसाळा तोंडावर आला तरी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नसल्याने ही कामे ३१ मेपर्यंत ९० टक्के आणि ७ जूनपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. तर ठाणे शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करण्यात अपयश आल्यास त्या प्रकरणी सहाय्यक आयुक्तांना व्यक्तिश: जबाबदार धरण्याचा इशारा जयस्वाल यांनी दिला. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने मान्सून पूर्व समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निश्चित करण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नालेसफाई अद्याप अपूर्ण अवस्थेत असून या परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नालेसाफाईला वेग आणणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेचे आयुक्तांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नालेसफाई विषयीची अखेरची मुदत दिली. ठाणे शहरातील नालेसफाईचे काम कोणत्याही परिस्थितीत ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांनी नालेसफाईच्या कामाची नियमित पाहणी करावी. नालेसफाई करतानाच रस्त्याच्या बाजूच्या गटारांचीही सफाई व्यवस्थितपणे होत असल्याबाबत खात्री करण्याच्या सूचना दिल्या.
ठाण्यातील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेकरिता साहाय्यक आयुक्तांनी अशा इमारती खाली करण्याची कारवाई सुरू करावी. ३१ म ेपर्यंत अशा धोकादायक इमारती खाली करण्यात त्यांना यश आले नाही तर त्याबाबत सहाय्यक आयुक्तांना व्यक्तिश: जबाबदार धरण्यात येईल. धोकादायक इमारतींमध्ये रहिवाशी असताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडून जीवित हानी झाल्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या बैठकीत दिला. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीत धोकादायक इमारत कोसळून अपघात घडल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. याबरोबरच अतिधोकादायक इमारत म्हणून खाली करण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना देण्यासाठी रेंटल हाऊसिंगमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच यांना बीएसयूपी योजनेतील सदनिका पावसाळ्याच्या काळात भाडेपट्टय़ावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क यादी..
पावसाळ्यामध्ये कुठलीही आपत्कालीन घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी एक व्यक्ती संपर्क यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये होणारी पुनरावृत्ती टाळून मदतकार्य प्रभावीपणे करण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यातील आवश्यक सर्वसाधनसामुग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, सर्व उपायुक्त, हवाई दल, महावितरण, महानगर गॅस, मध्य रेल्वे आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘नॉट रिचेबल’ अधिकाऱ्यांवर कारवाई
पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन रहिवासी संकटात असताना अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर ‘नॉट रिचेबल’ असतात. ज्या अधिकाऱ्याचा अशा प्रकारे भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला.