ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील २० खाटांच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या उपचारासाठी इंन्टेसिव्हिस्ट या तज्ज्ञ डॉक्टर पदाच्या १२ पैकी ११ जागा रिक्त असल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे एकाच इंन्टेसिव्हिस्ट या तज्ज्ञ डॉक्टरच्या खांद्यावर अतिदक्षता विभागाचा भार असून ही रिक्त पदे भरण्यासाठी पालिकेने आता भरती प्रक्रीया सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अंगावर गेल्या, शर्ट खेचला अन्…; भाजपा आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण

 ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात पाचशे खाटांचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. हि बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाची क्षमता पाचशे खाटांवरून १ हजार खाटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभागाची उभारणी करून त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा >>> आमच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलीस संरक्षण द्या; ठाणे काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रुग्णालयात वाचनालयही सुरु करण्यात आले आहे. याशिवाय, २० खाटांचा अतिदक्षता विभागही सुरु करण्यात आला असून या कक्षात आणखी २० खाटा वाढविण्यात येणार आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र एकाच इंन्टेसिव्हिस्ट या तज्ज्ञ डाॅक्टरच्या खांद्यावर अतिदक्षता विभागाचा भार असल्याची बाब समोर आली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंन्टेसिव्हीस्ट या पदाचे तज्ज्ञ डॉक्टर नेमले जातात. परंतु कळवा रुग्णालयातील २० अतिदक्षता विभागाकरिता १२ इंन्टेसिव्हीस्ट या पदे मंजुर आहेत. प्रत्यक्षात येथे एकच इंन्टेसिव्हीस्ट कार्यरत आहेत. तर, उर्वरित ११ जागा रिक्त आहेत. कळवा रुग्णालयातील चार निवासी डाॅक्टर, इतर विभागाचे प्रमुख तज्ज्ञ डॉक्टर हे अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करतात. यामुळे डाॅक्टरांवरही अतिरिक्त भार पडत आहे. याशिवाय, याठिकाणी प्रशिक्षत तज्ज्ञ परिचारिका आणि आरोग्यसेवकांची कमतरता आहे. हि बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता इंन्टेसिव्हीस्ट पदाच्या ११ रिक्त जागा भरण्याची प्रक्रीया सुरू केली असून त्यासाठी जाहिरात काढली आहे. या संदर्भात पालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता, या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc started the recruitment process in chhatrapati shivaji maharaj hospital in kalwa zws
Show comments