ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तसेच पुढील ३० वर्षांतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेने चार स्त्रोतांमधून तीनशे दशलक्षलीटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यानुसार पालघर जिल्ह्यातील सुर्या, देहरजे धरणांमधून प्रत्येकी शंभर दशलक्षलीटर तर, मिरा-भाईंदर शहराला सुर्या धरणातून पाणी उपलब्ध होताच, या शहराला स्टेम आणि एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील शंभर दशलक्ष लीटर पाणी ठाणे शहराला हवे आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाच्या राज्य शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून येथे मोठमोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत.

या संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला. त्यामध्ये शहरातील लोकसंख्येत दहा वर्षांनी ४५ टक्के वाढ होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान, पायाभुत सुविधा, क्लस्टर योजना, याचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील ३० वर्षांचा म्हणजेच २०५५ सालापर्यंतचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. एमसीएचआय क्रेडाई या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या आराखड्याचा उल्लेख केला होता.

या आराखड्यानुसार शहराला पुढील ३० वर्षात प्रतिदिन १११६ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. सद्यस्थितीत शहराला दररोज ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर असल्याने वाढीव पाण्यासाठी पालिकेने आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. या आराखड्यानुसार पालिकेला चार स्त्रोतांमधून दररोज तीनशे दशलक्षलीटर वाढीव पाणी हवे आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील सुर्या, देहरजे धरणांमधून प्रत्येकी शंभर दशलक्षलीटर इतके पाणी हवे असून त्यासाठी पालिकेने जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

मिरा-भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसीकडून दररोज २२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यात स्टेमकडून ८० दशलक्षलीटर तर, एमआयडीसीकडून ११५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. या शहराला सुर्या धरणातून २१८ दशलक्षलीटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे या शहराला स्टेम आणि एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील प्रत्येकी ५० दशलक्षलीटर इतके पाणी ठाणे शहराला देण्याची मागणी पालिकेेने केली आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेकडून शंभर दशलक्षलीटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Story img Loader