ठाणे : यंदाही पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका सज्ज असून गणेश मुर्तीं विसर्जनासाठी विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची निर्मिती तसेच गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. तसेच गणेशाच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रीम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यावरणाभिमुख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी ठाणे महापालिका अनेक वर्षांपासून उपाययोजना करीत आहे. शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे.  या व्यवस्थेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदाही तशाच प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. करोनाचा संसर्ग होवू नये यासाठी विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> गणेश विसर्जन निमित्ताने ठाणे जिल्ह्यात वाहतूक बदल

७ विसर्जन घाट

गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी महापालिकेच्यावतीने निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

कृत्र‍िम तलावांची निर्मिती

गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर(हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, असे पालिकेने म्हटले आहे.

हेही वाचा >>> ठाणे : १ लाख ४० हजार गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना

गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे

दरवर्षीप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेने मासुंदा तलाव, मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदया नगर ,शिवाई नगर, चिरंजीवी हॉस्पीटल,महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समिती कार्यालय, किसननगर  बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, टेंभी नाका, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार बस स्टॉप, वसंत विहार शाळा, कामगार हॉस्पिटल, लोकमान्य नगर बस स्टॉप यशोधन नगर, रिजन्सी हाईट्स, ट्रॉपिकल लगून समोर आनंदनगर, विजयनगरी अँनेक्सा कासारवडवली, लोढा लक्झेरिया, जेल तलाव, सह्याद्री शाळा मनीषा नगर, आणि दत्त मंदिर, शिळ प्रभाग कार्यालय या ठिकाणी गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी  निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्राप्त  होणा-या सर्व गणेश मुर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीद्वारे देखील विसर्जनासाठी ऑनलाईन वेळ निश्चिती नोंदणी योजनाही राबविण्यात येणार आहे. 

भाविकांची शीघ्र प्रतिजण चाचणी

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी शीघ्र प्रतिजण चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची शीघ्र प्रतिजण चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 50 हजार शीघ्र प्रतिजण चाचणी किट तयार ठेवण्यात येणार आहेत.                                                         

विशेष स्वयंसेवकांची नियुक्ती

नेहमीप्रमाणे दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जना दिवशी सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान तसेच इतर स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc to construct artificial ponds for immersion of ganesha idols in thane zws