गेल्या दहा दिवसांत ५०० बिघाडांची नोंद; आधीच अपुरी बससेवा त्यात आणखी रखडपट्टी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निम्म्याहून अधिक बसगाडय़ा नादुरुस्तावस्थेत आगारातच पडून राहिल्यामुळे आधीच ठाणेकर प्रवाशांना पुरेशी सेवा देण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) बससेवेची बसकण नवीन वर्षांतही सुरूच आहे.  गेल्या दहा दिवसांत तब्बल ५०० बिघाडाच्या घटनांची नोंद परिवहनकडे झाली आहे. त्यामुळे टीएमटीचा प्रवास सुखकर करण्याचे महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील एकूण ४१५ बसपैकी २२० बस रस्त्यावर नियमित धावतात. मात्र, या बसमध्येही बिघाड होण्याच्या घटना वाढत आहेत. दरदिवशी टीएमटीच्या ४०-४५ बसगाडय़ा भर रस्त्यात बंद पडत असल्याचे उघड होत  आहे. टायर फुटणे, सीएनजीचा अपुरा पुरवठा, ब्रेक लायनर नसणे, स्टेअरिंग खराब असणे, प्रवाशांचा अतिभार आदी कारणांमुळे बस भररस्त्यात बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना पुढील प्रवास दुसऱ्या वाहनाने अथवा पायपीट करून पूर्ण करावा लागतो. रात्रीच्या वेळी असा प्रकार घडला तर प्रवाशांच्या हालास पारावार राहत नाही.

७ ते १७ जानेवारी या १० दिवसांत टीएमटीच्या बसमध्ये बिघाड झाल्याच्या ५०० नोंदी परिवहन विभागाकडे आहेत. आधीच अपुरी बससेवा आणि त्यात बसमधील बिघाड  यामुळे प्रवाशांना रिक्षाकडे वळण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

रात्रीच्या वेळी टीएमटीमधून प्रवास करत असताना अचानक टायर फुटल्याने बस बंद पडली. दुसऱ्या बसची सुमारे १० मिनिटे वाट पाहिली. मात्र बस येत नसल्याचे पाहून रिक्षा पकडून घरी जावे लागले. तिकीट आधीच काढले असल्याने पैसेही वाया गेले.

– विजय सोनकांबळे, प्रवासी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmt bus problem