ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात बसेसची संख्या अपुरी असल्याने शहरात अतिरिक्त फेऱ्या वाढविणे शक्य नसल्याची कबुली प्रशासनाने देताच खडबडून जाग आलेल्या सत्ताधारी शिवसेनेने परिवहन सक्षमीकरणासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच महापौर संजय मोरे यांनी बुधवारी परिवहन प्रशासनासोबत तातडीने एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत टीएमटीची सेवा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी बेस्ट तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून प्रतिनियुक्तीवर उप-परिवहन व्यवस्थापकाची नेमणूक करणे आणि वाहतूक सल्लागार नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले.

अपुऱ्या बसेसच्या संख्येमुळे शहरातील विविध मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या वाढविणे शक्य होणार नसल्याची कबुली परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांना पाठविलेल्या एका पत्राद्वारे दिली आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. महापौर संजय मोरे यांनी या प्रश्नावर बुधवारी महापालिका मुख्यालयात तातडीने बैठक बोलावून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी ठाणे परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी बेस्ट परिवहन सेवेकडून किंवा राज्य परिवहन मंडळाकडून प्रतिनियुक्तीवर उप-परिवहन व्यवस्थापकाची नेमणूक करणे तसेच वाहतूक सल्लागार नियुक्त करणे यासाठी बैठक घेण्याचे आदेश मोरे यांनी दिले.
ठाणे परिवहन सेवेत आजही मानवी पद्धतीने तिकीट सेवा सुरू आहे. सरकारने आखून दिलेल्या दर करारानुसार ईटीआयएम मशीन्सच्या माध्यमातून तिकीट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जानेवारी महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे आणण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

बेस्टमध्ये विलीन करा
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात बसेसची संख्या अपुरी असल्यामुळे अतिरिक्त फेऱ्या वाढविणे शक्य नसल्याचे पत्र महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांना परिवहन प्रशासनाने पाठविले होते. या पाश्र्वभूमीवर संजय भोईर यांनी परिवहन प्रशासनाला पुन्हा एक पत्र पाठविले असून त्यामध्ये परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. ठाणे शहरातील विविध मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यासाठी परिवहन सेवा सक्षम नसेल तर परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Story img Loader