ठाण्यात रस्त्यांवर धावणारी टीएमटीची बस दिसली रे दिसली की आत उडी ठोकायची आणि सीट मिळवायची हा ठाणे पोलिसांचा नेहमीचा शिरस्ता. या मोबदल्यात टीएमटीला काय तर फुटकी कवडीही नाही. सारा काही फुकटचा मामला. पण हे सारे आता टीएमटी व्यवस्थापनाला डोईजड होत आहे. पोलिसांकडे तब्बल साडेपाच कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या वर्षीपासून पोलीस टीएमटीला अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तोटय़ात चाललेल्या या उपक्रमाची अवस्था ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी झाली आहे. त्यातही ही रक्कम आता प्रवाशांच्याच खिशातून काढण्याचा ‘प्रस्ताव’ टीएमटीने ठेवला आहे. येत्या काही दिवसांत बसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ३१३ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी १८० बस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतात. उर्वरित बस देखभाल, दुरुस्तीअभावी अथवा अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आगारांमध्ये धूळ खात आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लोकमान्यनगर परिसरात ‘टीएमटी’ने २५ बसेस भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्या आहेत. याशिवाय ठाणे-मुंबई मार्गावर वातानुकूलित व्होल्वो बसगाडय़ा धावतात. या सगळ्या मार्गावर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्याची सूट आहे.
‘टीएमटी’ व्यवस्थापनाने यंदाच्या वर्षी प्रवासी भाडय़ापोटी ९७ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. याशिवाय जाहिरात भाडे, विद्यार्थी पास, भंगार विक्री यासारख्या माध्यमातून सुमारे दहा कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी मोफत प्रवास करीत असल्याने त्या प्रवासापोटी ठाणे पोलीस दलाकडून ‘टीएमटी’ला ‘पोलीस ग्रँट’ नावाखाली अनुदान देण्याची तरतूद आहे. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांना न्यायालयात अथवा तपासासाठी नेण्यासाठी बसेसचा वापर करावा लागतो. अशा वेळी कर्मचाऱ्यांसोबत आरोपींचे तिकीटही या अनुदानाच्या माध्यमातून द्यावे, अशी तरतूद आहे. मात्र, सहा वर्षांपासून ठाणे पोलिसांनी ‘फुकट’ प्रवास सुरू ठेवला असून या अनुदानापोटी साधा छदामही टीएमटीकडे सुपूर्द केलेला नाही. गेल्या वर्षी या अनुदानाचा आकडा चार कोटी ७९ लाखांच्या घरात होता. आता हा आकडा पाच कोटी ७५ लाख रुपयांपर्यंत पोहचला आहे. यंदाच्या आर्थिक संकल्पात पोलीस अनुदानातील सुमारे दोन कोटी रुपये जमा होतील, असे गृहीत धरण्यात आले होते. पोलिसांना सूट मिळावी यासाठी दोन कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात जमा व्हावा, असे अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र, ठाणे पोलिसांनी दोन कोटी रुपयांची रकम अद्याप भरलेली नाही. या अनुदानाकरिता परिवहन प्रशासनामार्फत ठाणे पोलिसांना पत्र व्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यास ठाणे पोलीस ठेंगा दाखवत असल्याचे समोर आले आहे.

टीएमटीची चाके तोटय़ात
ठाणे परिवहन उपक्रमच्या बसगाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या विविध घटकांना सवलती देण्यात येत असल्याने परिवहन उपक्रमाला गेल्या वर्षी सुमारे एक कोटी ६३ लाख रुपयांचा बोजा सहन करावा लागला आहे. यामुळे परिवहन उपक्रमाने महापालिकेकडे अनुदानाची मागणी केली होती. तसेच गेल्या काही वर्षांपासून परिवहन उपक्रमाने कामगारांची देणी थकविली असून हा आकडा कोटींच्या घरात आहे. परिवहनचे आर्थिक चाक गाळात रुतलेले असतानाच ठाणे पोलिसांनी पाच कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान थकविले आहे. यामुळे परिवहन प्रशासन आणखीनच आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

Story img Loader