खासगी बसवाहतूक बंद झाल्याने उत्पन्नात दिवसाला ५० हजारांची वाढ
ठाण्यात वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस गाडय़ांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कोपरीतून सुटणाऱ्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) बसगाडय़ांच्या उत्पन्नात दिवसाला सुमारे ५० हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून डबघाईला आलेल्या टीएमटी बससेवेला बळकटी मिळू लागली आहे.
ठाणे महानगर परिवहन विभागाच्या परिवहन सेवेबाबत प्रवाशांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उचलत ठाण्यात खासगी बसमार्फत बेकायदा प्रवासी वाहतूक करण्यात येत होती. घोडबंदर परिसरातून ठाणे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असताना, हे प्रवासी आपल्याकडे खेचून घेण्यात खासगी बसवाहतूकदारांना यश मिळाले होते. या मनमानी कारभाराविरोधात तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी कारवाईचा बडगा उचलला होता.
मात्र, त्यांची बदली होताच पुन्हा एकदा ही बेकायदा वाहतूक सुरू झाली. खासगी बस गाडय़ांच्या वाढत्या संख्येने कालांतराने टीएमटीवरच कोपरीतून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली होती.
परिणामी टीएमटीचे चाक आणखी तोटय़ाच्या गर्तेत रुतले होते. काही दिवसांपूर्वीच कोपरी येथे एका वृद्धाला खासगी बसचालकाने धडक दिल्यानंतर कोपरीतील रहिवाशांनी खासगी बस चालकांविरोधात आंदोलन सुरू केले.
कोपरीकरांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक पोलीस खासगी बसचालकांविरोधात बारा बंगला येथेपर्यंत कारवाई करत आहेत. त्यामुळे खासगी बसमध्ये प्रवास करणारे अनेक प्रवासी पुन्हा टीएमटीकडे वळल्याचे चित्र आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून टीएमटीने दिवसभरात कोपरी ते कासारवडवली मार्गावर १० जादा बसगाडय़ा सोडल्या आहेत. या जादा बसगाडय़ांचे दर दिवसाचे उत्पन्न ५० हजार रुपये इतके झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.