सर्वेक्षणासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चणचण
भोंगळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मध्यंतरी प्रवाशांच्या सोयीसाठी अॅप तयार करण्याची घोषणा केली होती. बससेवा अधिक स्मार्ट व्हावी हा या मागचा उद्देश होता. हे अॅप नेमके कसे असावे आणि त्यामध्ये प्रवाशांच्या हिताच्या आणखी कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे ठरविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण हाती घेण्याचा निर्णय टीएमटी प्रशासनाने घेतला होता. मात्र, या सर्वेक्षणासाठी विद्यार्थीच सापडत नसल्याने टीएमटी बससेवा ‘टच स्क्रीन’वरची नेण्याची ही अनोखी संकल्पना अद्याप कागदावरच असल्याचे चित्र पुढे येत आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रम अधिक प्रवासी हिताय व्हावा यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू केले आहेत. परिवहन प्रशासनाने यासाठी आधुनिकतेची कास धरावी असा आग्रह जयस्वाल यांनी धरला आहे. हे लक्षात घेऊन टीएमटी प्रशासनाने मध्यंतरी प्रवाशांसाठी अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बसगाडय़ांचे वेळापत्रक, प्रवासी मार्गावर त्या नेमक्या कुठे आहेत तसेच रद्द करण्यात आलेल्या बसगाडय़ांची सविस्तर माहिती अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना दिली जाईल, असा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. याचे प्रात्यक्षिक दोन महिन्यांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल तसेच परिवहन समितीमधील वरिष्ठ अधिकारी, सदस्यांसमोर अॅप तयार करणाऱ्या कंपनीने दाखविले होते.
या ‘अॅप’मध्ये आणखी काही सुधारणा आणि माहिती संकलित व्हावी यासाठी ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील तब्बल ६० विद्यार्थ्यांची या कामी मदत घेण्याचे ठरले होते. हे विद्यार्थी प्रवाशांशी बोलून सर्वेक्षण करणार होते. त्यानुसार अॅपमध्ये आणखी सुधारणा केल्या जातील, असे ठरविले होते. मात्र, दोन महिन्यांपासून परिवहन विभागाला सर्वेक्षण करणारे विद्यार्थीच मिळत नसल्याने ही ‘अॅप’ची संकल्पना रखडली आहे.
दिवाळीच्या काळात विद्यार्थी गावी असल्याने तसेच दिवाळ नंतर परीक्षा सुरू असल्याने सर्वेक्षणासाठी विद्यार्थी मिळाले नाही. येत्या काही दिवसांत आम्ही संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून लवकरच विद्यार्थ्यांना सर्वेक्षण करण्यासाठी तयार करणार आहोत असे परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
असे असेल अॅप..
हे अॅप ‘स्मार्टफोन’वर मोफत डाऊनलोड करता येणार आहे. तसेच अॅपमध्ये टीएमटीचे सर्व मार्ग असून ज्या मार्गावरून प्रवास करायचा आहे, तो मार्ग निवडल्यानंतर त्यावर धावणाऱ्या टीएमटी बस कुठे आहेत, त्या किती वेळात बस थांब्यावर पोहचण्याची अपेक्षा आहे, रद्द झालेल्या बसची माहिती या अॅपद्वारे मिळणार आहे. मात्र, या परिवहन विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना सोसावा लागत आहे.