ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात पर्यावरणपुरक वीजेवरील १२३ पैकी ११ वातानुकूलीत बसगाड्या प्रवाशी सुविधेसाठी उपलब्ध झालेल्या असतानाच, वातानुकूलीत बसगाड्यांचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय परिवहन समिती तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार वातानुकूलीत बसचे कमीत कमी तिकीट दर १० रुपये तर, जास्तीत जास्त तिकीट ६५ रुपये इतके करण्यात आले आहे. यापुर्वी कमीत कमी तिकीट २० रुपये तर जास्तीत जास्त तिकीट १०५ रुपये इतके होते. बसचे तिकीट दर निम्याने कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दर्शनासाठी आली आणि चोरी करून गेली; महिलेकडून मंदिरात चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिला कैद

ठाणे परिवहन उपक्रमामार्फत व्होल्व्हो वातानुकूलित बसगाड्या बोरीवली मार्गावर चालविण्यात येतात. या बसचे तिकटी दर २ किलोमीटर अंतरापर्यत २० रुपये इतके आहे. याच मार्गावर बेस्टचे तिकीट दर ६ रुपये तर एनएमएमटीचे तिकीट दर १० रुपये इतके आकारले जात होते. कमी तिकीट दरामुळे प्रवाशांचा बेस्ट किंवा एनएमएमटीच्या बसगाड्यांंकडे अधिक ओढा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता प्रवाशांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २ किलोमीटरसाठी १० रुपये तर, ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १०५ रुपयांऐवजी ६५ रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे.  त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास कमी दरामध्ये सुखकर होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा >>> Video : ‘दारु का प्यायलास’ विचारले म्हणून आंबिवलीत डॉक्टरला माराहण

ठाणे परिवहन उपक्रमाची सेवा अधिक सक्षम व्हावी आणि प्रवाशांचा प्रवास आरामदायी व सुखकर व्हावा यासाठी विद्युत बसगाड्या खरेदी करण्यात येत आहेत. या बस सेवेचा फायदा प्रवाशांनी घ्यावा आणि ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी असावी या उद्देशातून बसचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच परिवहन सेवा अधिक स्वस्त आणि सुविधाजनक झाली असल्याने परिवहन बस गाड्यांचा वापर वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. टिएमटीच्या ताफ्यात वीजेवरील बसगाड्या दाखल झाल्यामुळे जुन्या झालेल्या डिझेलवरील बसगाड्या निकाली काढणे शक्य होईल. त्यामुळे परिवहन सेवेला होणारा तोटा कमी करणे शक्य होईल. भविष्यामध्ये अधिक गर्दीच्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याकडे परिवहन सेवेचा भर असेल. परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांचा अधिकाधिक वापर करण्यावर नागरिकांना प्रोत्साहन मिळेल, अशा पध्दतीने धोरणात्मक बदल केले जातील असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

विजेवरील बसगाड्या चालविण्यात येणार

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशातून परिवहन सेवेच्या माध्यमातून विजेवरील बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. आगामी काळात १२३ बसगाड्या परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यात ४५ स्टॅण्डर्ड व १६ मिडी अशा एकूण ७१ वातानुकूलित बसगाड्या आहेत. तर, १० स्टॅण्डर्ड  व ४२ मिडी अशा एकूण ५२ सर्वसाधारण बसगाड्या टप्याटप्याने दाखल होणार आहेत. वातानुकूलित २६ मिडी बसगाड्या शहरातंर्गत तर, उर्वरित ४५ स्टॅण्डर्ड बसगाड्या ठाणे शहराबाहेरील लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यात घाटकोपर, नवीमुंबई, पनवेल या मार्गाचा समावेश असेल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

असे असतील तिकीट दर

किलोमीटर              पुर्वीचे दर          सुधारीत दर

०-२                      २०                      १०

२-४                     २५                      १२

४-६                     ३०                       १५

६-८                     ३५                      १८

८-१०                   ४०                       २०

१०-१४                   ५०                       २५

१४-१६                  ५५                      २५

१६-२०                  ६५                      ३०

२०-२२                  ७५                    ३५

२२-२४                   ७५                    ४०

२४-२६                   ८०                    ४५

२६-३०                  ८५                     ५०

३०-३४                  ९५                     ५५

३४-३६                  १००                    ६०

३६-३८                 १०५                     ६०

३८-४०                 १०५                    ६५

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmt reduce ac bus fare by 50 percent zws
Show comments