ठाणे : करोना काळामुळे ठप्प झालेली तसेच गेल्या आठ वर्षांपासून ठेकेदार मिळत नसल्याने महापालिकेच्या टिएमटी बसवरील जाहीरात योजना कागदावरच होती. परंतु या योजनेकरिता आता ठेकेदारांनी प्रतिसाद दिल्याने ती मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या योजनेत ३१० बसगाड्यांवरील जाहीरातून टिएमटीला पुढील पाच वर्षे सुमारे १२ कोटींचा महसुल मिळणार आहे. करोना काळ आणि बस गाड्यांची अनुउपलब्धता यामुळे बस गाड्यांवरील जाहिरातीतून टीएमटीला मिळणारे वार्षिक उत्पन्न ४० ते ५० लाख रुपयांवर आले होते. त्यात आता भरीव वाढ होईल, असा दावा टीएमटी प्रशासनाला केला आहे.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे तसेच ठाणे महापालिका परिवहन समितीने केलेल्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात, टीएमटीच्या ताफ्यातील १५ वातानुकूलीत बसगाड्या, ११० स्टँडर्ड बसगाड्या, ९० मिडी बसगाड्या, ‘जेएनयूआरएम’मधील नवीन आणि जुन्या ४५ बसगाड्या, ५० तेजस्विनी बसगाड्या अशा एकूण ३१० बस गाड्यांवर भाडेतत्त्वाने पाच वर्षांच्या कालावधीसाठी जाहिराती देता येणार आहेत. नवीन निविदेत जाहिरातींसाठी पाच वर्षांचा निविदा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी  भाडे दरात ५ टक्के वाढ होणार आहे. कंत्राटदाराला एक महिना कालावधीचे आगाऊ जाहिरात भाडे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जमा करावे लागणार आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत सरासरी प्रती बस, प्रती महा ५७७६ रुपये दर मिळणार आहे. त्यात दर वर्षी पाच टक्के वाढ होऊन पाच वर्षात टीएमटीला सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

हेही वाचा >>>कल्याण रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

बसगाड्यांवरील जाहिरात हक्कांसाठी यापूर्वी, २०१० ते २०१३ आणि २०१३ ते २०१६ अशा काळासाठी जाहिरात निविदा काढण्यात आल्या होत्या. टीएमटीने २०१६मध्ये जाहिरातींची निविदा काढली होती. ती निविदा मुदतवाढ देऊन २०२१ पर्यंत सुरू होती. २०१६ ते २०२३ या काळात १० वेळा निविदा काढण्यात आल्या. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. २०२१ ते २०२३ या काळात करोनामुळे जाहिरातींची प्रक्रिया ठप्प होती. करोना काळ आणि अल्प प्रतिसाद यामुळे ही प्रक्रिया आठ वर्षे खोळंबली होती. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करताना स्पर्धात्मक निविदेच्या अटी शर्तीत आवश्यक ते बदल करून तसेच, इतर परिवहन सेवांच्या दरांचा विचार करून ही प्रक्रिया करण्यात आली. त्यास ठेकेदारांनी अखेर प्रतिसाद दिला आहे. नवीन निविदा प्रक्रियेत एकूण ३१० बसगाड्यांवरील जाहिरातींचा समावेश आहे. परंतु त्यात विद्युत बसगाड्यांचा समावेश नाही. त्यांच्या जाहिरातींचे हक्क संबंधित कंत्राटदाराकडे आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Story img Loader