ठाणे : भिवंडीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूकीत दोन गटांत वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नवरात्रोत्सवात या घटनेची पूनरावृत्ती टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता भिवंडी शहरातील शहरी आणि ग्रामीण भागात दररोज गस्ती घालण्यास सुरूवात केली आहे. शांतता समिती तसेच नवरात्रोत्सव मंडळांना सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. समाजमाध्यमांवर अफवा पसरणार नाही. याकडेही पोलिसांचे लक्ष आहे. समाजमाध्यमांवरून धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा व्हावा यासाठी संपूर्ण आयुक्तालयात सहा हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले.

अनंत चतुर्दशी निमित्ताने भिवंडीत एका गणेशोत्सव मंडळाची गणेश मुर्ती विसर्जन मिरवणूक निघाली होती. त्यावेळी दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाला शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यानंतर भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी ठाणे पोलीस आता सतर्क झाले आहेत. मागील आठवडाभरापासून दररोज पोलिसांकडून भिवंडी शहरात गस्ती घातली जात आहे. तसेच रूट मार्च देखील काढले जात आहे. सलोखा राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी, मोहल्ले, नवरात्रोत्सव मंडळांमध्ये पोलिसांकडून बैठका घेतल्या जात आहे. शांतता समितीच्या माध्यमातून पोलिसांकडून नागरिकांची भेटीगाठी घेतल्या जात आहेत. भिवंडीत पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त कंपन्या तैनात केल्या आहेत. मुख्यालयातूनही बंदोबस्तासाठी मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तर संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात ठाणे पोलिसांचा सुमारे सहा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चोरी तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी गरबा कार्यक्रमात देखील महिला आणि पुरूष पोलिसांचे पथक साध्या वेशामध्ये तैनात असणार आहे.

हे ही वाचा…ठाणे : कळव्यामधील एका शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा

धार्मिक तेढ निर्माण होईल असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये. असे संदेश किंवा चित्रीकरण आढळल्यास तात्काळ याबाबतची माहिती संबंधित विभागातील पोलिसांना द्यावी. जो कोणी व्यक्ती असे संदेश, चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करेल त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. – ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्त, ठाणे शहर पोलीस.