कल्याण – स्वताची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने अंंधेरीतील एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीचा लॅपटाॅप त्याला अंधारात ठेऊन घाटकोपर येथे विकला. हा चोरीचा बनाव दडपण्यासाठी या तरुणीने कल्याणमध्ये येऊन स्वताच्या अंगावर ब्लिचिंग पावडर टाकून आपणास दोन भामट्यांनी लटून जवळील लॅपटॉप चोरून नेल्याचा बनाव रचल्याचा प्रकार कोळसेवाडी पोलिसांनी उघडकीला आणला आहे.
गेल्या आठवड्यात कल्याण पूर्वेत लोकग्राम वाहनतळ भागातून दुपारच्या वेळेत पायी चाललेल्या एका तरुणीला दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांंनी तिच्या अंगावर ज्वलनशील पावडर टाकून तिला लुटले. तिच्या जवळील लॅपटाॅप चोरीला गेला, अशी घटना घडली होती. या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. तपास करताना घटनास्थळावरचे सीसीटीव्ही, या मुलीच्या मोबाईल ठिकाण असे कोणतीही संंगती जुळत नव्हती. पोलिसांना या मुलीच्या तक्रारीचा संशय आला आणि त्यातून या तरुणीने केलेली लबाडी पोलीस तपासात उघड झाली. अंजली प्रवेशचंद पांडे (२६, रा. जगन्नाथ चाळ, नागरदास रस्ता, अंधेरी पूर्व) असे तक्रारदार तरुणीचे नाव आहे.
हेही वाचा – ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद
पोलिसांनी सांंगितले, अंजली पांडे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करत आहे. ती एका खासगी कुरिअर कंपनीत नोकरीला होती. कुरिअर कंपनी बंद पडल्याने तिची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती. तिला घर चालविणे अवघड झाले होते. युपीएससी परीक्षा खासगी शिकवणीचे शुल्क देणे तिला शक्य नव्हते. अंजलीचे लग्न कल्याण पूर्वेतील नांदिवली भागात राहणाऱ्या अमन चौबे यांच्या बरोबर होणार होते. अंजलीच्या मागणीवरून अमनने आपला लॅपटाॅप अंजलीला काही दिवस वापरण्यासाठी दिला होता.
अनेक दिवस होऊनही अंजली लॅपटाॅप परत करण्याचे नाव घेत नव्हती. अमनला स्वताचे ऑनलाईन काम करणे अवघड जात होते. त्यामुळे अमन अंजलीला लॅपटाॅप तात्काळ परत आण, अन्यथा आपले प्रस्तावित विवाहाचे संबंध तोडून टाकतो, असा इशारा देत होता. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे अंजलीने अमनचा लॅपटाॅप साडेचार हजार रुपयांना घाटकोपर येथील एका विक्रेत्याला विकला होता. हे अमनला समजले तर तो आपल्या बरोबरचे संबंध तोडील. तसेच अमन सतत लॅपटाॅप परत देण्याची मागणी करत असल्याने आता त्याला लॅपटाॅप परत कुठून द्यायचा असा प्रश्न अंजलीसमोर पडला होता.
हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात दहावीचा ९५.५६ टक्के निकाल, ९६. ७९ मुली तर, ९४.३९ टक्के मुल उत्तीर्ण
अमनला चकवा देण्यासाठी अंजलीने एक शक्कल लढवली. लॅपटाॅप चोरट्यांनी लुटला हे दाखविण्यासाठी गेल्या शनिवारी अंजली कल्याणमध्ये आली. तिने एका दुकानातून ब्लिचिंग पावडर खरेदी केली. ही पावडर घेऊन ती कल्याण पूर्वेतील एका स्वच्छता गृहात गेली. तेथे तिने स्वताहून ब्लिचिंंग पावडर टाकून घेतली. तेथून बाहेर येऊन अमनला संपर्क केला. की दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी माझ्या अंगावर ज्वलनशील पावडर टाकली. त्यांनी हुल्लड करत माझ्या जवळील लॅपटाॅप हिसकावून पळ काढला. अमनला अंजलीच्या बोलण्यावर विश्वास बसला. तो तात्काळ घटनास्थळी आला. दोघांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तपासातून अंजलीने केलेला बनाव उघडकीला आला. पोलिसांनी अंजलीच्या या कृतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे.