निसर्ग किंवा हिरवाई अनुभवयाची असेल तर आपण डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यात धाव घेतो. पण वाढत्या नागरीकरणामुळे डोंगरावरील वनसंपदेलाही धक्का बसू लागला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्याच्या आसपासच्या भागातील अनेक डोंगर ओसाड पडल्याचे दिसून येते. हीच गोष्ट हेरून कल्याणमधील अविनाश पाटील या तरुणाने डोंगरांना पुन्हा हिरवाईने नटवण्याचा विडाच उचलला आहे. डोंगरांवर जाऊन वृक्षारोपण केले की संपली जबाबदारी, असं न मानता अविनाश ही झाडे जगतील आणि बहरतील, याची पुरेपूर खबरदारी घेतो. त्यासाठी त्याने आपल्या घरातच निसर्गउद्यान सुरू केले आहे. घरातील बाटल्यांमध्ये बीजरोपण करून त्याची मोठी रोपे बनेपर्यंत अविनाश घराच्या अंगणातच त्यांची देखभाल करतो आणि नंतर डोंगरावर नेऊन त्यांची लागवड करतो. अशी रोपे डोंगरदऱ्यांतील पाऊस, हवा यांच्या माऱ्याला समर्थपणे तोंड देत जगतात.
अविनाश पाटील कल्याणमधील रामबाग चारमध्ये राहतो. सध्या तो चर्चगेट येथील निर्मला निकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. प्लॅस्टिकच्या वाया जाणाऱ्या बाटल्या तोंडाच्या दिशेने कापून त्यात माती, खत, पाला पाचोळा यांचे मिश्रण घालून तो बियांची लागवड करतो. रोपे उगवून ती वाऱ्या पावसाच्या माऱ्यात तग धरण्याएवढी झाली की डोंगरावर नेऊन त्यांची पद्धतशीर लागवड करतो. अशा प्रकारे आत्तापर्यंत त्याने भिवंडी तालुक्यातील लोनाड लेणी असणाऱ्या डोंगरावर ३० ते ३५ वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांची नीट जोपासना व्हावी त्यासाठी तो विशेष लक्ष देत आहे. दर आठवडय़ाला तो तेथे जाऊन त्यांची देखभाल करतो.सुरुवातीला आम्ही वांगणी, कर्जत, कसारा येथील जंगलात बिया फेकल्या. मात्र या बियांचे झाड आले की नाही, ते जगले की नाही हे लक्षात येत नव्हते. त्यामुळे बिया उगवून त्यांचे रोप झाल्यावर रोपांची लागवड करण्याचे आम्ही ठरविले. त्यासाठी घरातच नर्सरी सुरू केली. प्लॅस्टिकच्या वाया जाणाऱ्या बाटल्यांमध्ये रिठा, बाभूळ, चिंचा यांसारख्या बिया सुरुवातीला रुजविल्या. ८ ते १० दिवसांत त्याचे रोप उगवते. रोपे थोडी मोठी झाल्यावर त्यांची लोणाड येथील डोंगरावर लागवड करतो. माझी ही धडपड पाहून माझ्याच सोसायटीत राहणारे माझे मित्र स्वप्निल शिरसाट व भूषण राजेशिर्के यांनीही आपआपल्या घरी हा उपक्रम सुरू केला आहे, अशी माहितीही अविनाशने दिली. केवळ रोपे लावून थांबायचे नाही तर ती जतन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच आमच्या सोसायटीतील नागरिकांची परवानगी घेऊन गच्चीवर जास्तीत जास्त रोपे लावून ती जंगलात नेऊन लावण्याची आमची योजना आहे. शहरातील तरुणांनीही आमच्या या उपक्रमात आम्हाला साथ द्यावी, सोसायटीच्या आवारात किंवा खुल्या जागेत रोपलागवड करावी, आम्ही त्या रोपांची डोंगर-पठारावर अथवा जंगलात लागवड करू, असे आवाहन अविनाशने केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा