ठाणे : ठाणे शहरातील हवा सर्वकाळात उत्तम रहावी, यासाठी पालिका प्रशासनाने सीईईडब्ल्यू आणि यूएसएड या संस्थेच्या मदतीने ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील हवामान विभागाच्या धर्तीवर ७२ तासआधी ठाण्यातील हवा गुणवत्तेचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. यामुळे हवा प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेला उपाययोजना करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांमध्ये गेल्यावर्षी हवा प्रदुषणात वाढ झाल्याचे समोर आले होते. हवा प्रदुषण कमी करण्यासाठी उच्च न्यायलयाने उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासन आणि महापालिकांना दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने हवा प्रदुषण रोखण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजवणी सुरू केली होती. यामध्ये कचरा जाळणे, राडारोड्याची वाहतूक करणे तसेच हवा प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील हवा सर्वकाळात उत्तम रहावी, यासाठी पालिका प्रशासनाने ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यान्वित केली आहे. कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर (सी ई ई डब्ल्यू) आणि युएसएड यांनी संयुक्तपणे ही ऑनलाइन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी, वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार शहरातील हवेची गुणवत्तेची मोजणी केली जाणार आहे. तसेच हवा प्रदुषणास कारणीभूत ठरणारे स्थानिक घटक, हवामान बदल आणि परिसरातील कचरा व्यवस्थापन, या सर्वांचा सविस्तर अभ्यास करून ७२ तासआधी शहरातील हवा गुवणत्तेचा अंदाज वर्तविला जाणार आहे. शहरात कचरा जाळून प्रदुषण करण्यात येते. काही ठिकाणी धुळ प्रदुषण करण्यात येते. याबाबतची माहिती शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांद्वारे घेतली जाणार असून त्यानंतर पथके तिथे जाऊन तेथील हवेची गुणवत्ता तपासून त्यावर उपाययोजना सुचविणार आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता, नव्या यंत्रणेमुळे राज्यातील हवामान विभागाच्या धर्तीवर ७२ तासआधी ठाण्यातील हवा गुणवत्तेची माहिती मिळणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी हवा प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा…अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात
उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यांनंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणाऱ्या नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे. या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल. या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणखी चांगली स्थिती आपल्याला राखता येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा, यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे.
सौरभ राव (आयुक्त, ठाणे महापालिका)
हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी, वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते. हवेचे प्रदूषण आणि वातावरण बदल यांचा अन्योन्य संबंध आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘क्लीन एअर आणि बेटर हेल्थ’ या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेसाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे ठाणे महापालिकेला हवा प्रदूषणाशी सामना करण्यासाठी योग्य अशी माहिती मिळेल. त्यातून उपाययोजना करता येतील. राज्यात अशाप्रकारे प्रथमच ही यंत्रणा सुरू होत आहे, असे ‘यूएसएड इंडिया’ या संस्थेचे उपसंचालक वर्गीस पॉल यांनी सांगितल