भूतकाळाचे वर्तमान
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि वर्ल्ड लाइफ फंड या निसर्गजतनविषयक क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील दोन विख्यात संस्था. दोन्ही संस्थांतर्फे निसर्गअभ्यासविषयक काही कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जात असत. याचा लाभ केवळ मुंबई महानगरातील शाळांनाच होत असे. मुंबईच्या आसपास असणाऱ्या ठाण्यासारख्या नगरातील शाळा त्यांच्या कार्यकक्षेबाहेर असल्याने त्यांना या निसर्गविषयक उपक्रमांचा लाभ मिळत नसे. कारणवशात या दोन्ही संस्थांशी माझा सदस्य म्हणून संबंध आल्यानंतर, ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठीही काही उपक्रम राबविण्यात यावेत, असा हट्ट मी सातत्याने करीत राहिलो. वर्षभरातच हे प्रयत्न फलद्रूप झाले. सुरुवात आमच्या मो.ह. विद्यालयापासून झाली. आमच्या शाळेत कोतवाल निसर्ग मंडळ स्थापन झाले (१९८०). मंडळाच्या सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १९९६ पर्यंत प्रतिवर्षी भरगच्च कार्यक्रम होत राहिले. या दोन्ही संस्थांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी- शैलजा गब्र व चंद्रकांत वाकणकर यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले. ठाणे जिल्ह्य़ाचे तत्कालीन वनाधिकारी वुरकुले यांचेही उदंड सहकार्य आमच्या शालेय उपक्रमांना मिळाले. १९८० च्या मे महिन्यात येऊर टेकडीवर दोन हजार वृक्षांची लागवड करण्याची योजना वन विभागाने आखली होती. त्यासाठी एक हजार खड्डे खोदण्याचे काम मो.ह. विद्यालयाच्या कोतवाल निसर्ग मंडळाच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तत्कालीन वनमंत्री नानाभाऊ मेंबडवार उपस्थित होते. त्यानंतर लगेचच ‘कोतवाल’ सदस्यांनी वन विभाग आणि वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड यांच्या मदतीने एक भव्य वन्यजीव प्रदर्शन शाळेच्या प्रांगणात आयोजित केले होते. ठाणेकर नागरिकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातील योजना व मांडणी पाहून मुंबई दूरदर्शनचे विश्वास मेहेंदळे हे मुख्याधिकारी इतके खूश झाले की, त्यांनी दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये या वृत्ताला सविस्तर प्रसिद्धी दिली होती.कोतवाल निसर्ग मंडळातर्फे पुढील सोळा वर्षे विद्यार्थ्यांसाठी वन्यजीवनविषयक अक्षरश: शेकडो कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. त्यामध्ये साप्ताहिक स्लाइड शोज, वन्यजीवविषयक फिल्मस्, प्रदर्शने, चित्रकला स्पर्धा, शिबिरे, पक्षिनिरीक्षण सहली असे बहुविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अरुण ठाकूर या ठाण्यातील एक उत्साही आणि विद्यार्थिप्रेमी गिर्यारोहक मित्राचा विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांत उदंड सहभाग आणि साहाय्य मिळाले. ठाणे वन विभागाचे तत्कालीन मुख्याधिकारी काकोडकर निसर्ग मंडळाच्या कार्यक्रमाकडे जातीने लक्ष पुरवीत असत. अनेक कार्यक्रमांना ते जातीने उपस्थित राहत. ठाणे वन विभागाच्या एकूणच सहकार्यामुळे मुंबई व ठाणे विभागातील विद्यार्थ्यांच्या निसर्गअभ्यासाला मोठी चालना मिळाली. डॉ. दीपक आपटे या ठाणेकर अभ्यासकाचे बी.एन.एच.एस.चे शिक्षणाधिकारी या नात्याने मोलाचे साहाय्य केले. (आज ते त्या संस्थेचे ‘डायरेक्टर’ हे पद भूषवीत आहेत.) ही ठाणेवासीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. ठाणे परिसरांत आजही ज्या संस्था आणि व्यक्ती निसर्गशिक्षण आणि जनजागृतीसाठी काम करीत आहेत. त्या सर्वानाच त्यांचा उदंड फायदा होईल यात शंका नाही. ठाणे परिसरातील आणखी काही व्यक्तींचा ठाण्यातील या सुरुवातीच्या निसर्गशिक्षण चळवळीशी संबंध आला. अशा काहींची या इतिहासात नक्कीच नोंद घ्यायला हवी. युवराज गुर्जर, मकरंद जोशी आणि राजू पवार या तरुणांनी निसर्गातील काही सूक्ष्म विषयांचा वैयक्तिकरीत्या सखोल अभ्यास केला आहे. युवराज आता जागतिक कीर्तीचा फुलपाखरे व सूक्ष्म जीव अभ्यासकआणि छायाचित्रकार बनला आहे. त्याच्या अनेक छायाचित्रांना परदेशातही पारितोषिके मिळाली आहेत. मकरंद सर्पाचा अभ्यासक आहे. राजू विविध वनस्पतींचा व्यापारी लागवडीच्या क्षेत्रांत अग्रेसर आहे. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात ठाण्यातील निसर्गअभ्यासाच्या क्षेत्रात काहीशी मरगळ असल्यासारखी स्थिती उत्पन्न झाली होती. अशा वेळी रोटरीयन श्याम घाटे यांनी मशाल आपल्या हाती घेतली. रोटरी क्लबअंतर्गत त्यांनी ‘होप’ या संस्थेची सुरुवात केली. होपतर्फे त्यांनी विशेषत: प्रौढांसाठी (स्थापना- १६ जुलै १९९६) दर महिन्याला एक किंवा दोन निसर्गविषयक कार्यक्रम करण्याचा उपक्रम सुरूकेला. त्यांत चर्चासत्रे, तज्ज्ञांची व्याख्याने, वन्यजीवनविषयक चित्रपट आणि स्लाइड शो, छायाचित्र प्रदर्शने असे कार्यक्रम होत असत. १७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन डिसेंबर १९९८ मध्ये ओवळा येथे संपन्न झाले ते होपच्याच माध्यमातून. बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर, रुईया महाविद्यालयातील विख्यात जीवशास्त्र प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, अनिल कुंटे यांच्यासारख्या मातब्बरांचे सहकार्य लाभल्यामुळे ‘होप’ने अनेक पर्यावरणविषयक उपक्रम पार पाडले. पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या माध्यमातून गेली सुमारे बारा वर्षे पर्यावरणविषयक केवळ सैद्धांतिक चर्चासत्रांमध्ये गुंतून न राहता प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांनाही सुरुवात केली आहे. ठाण्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक कामात सहभागी झाल्याचा आनंद मिळावा यासाठी दर वर्षी एक दिवसाचा मेळावा साजरा केला जातो. ठाण्यातील पन्नास शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थी त्यात भाग घेतात. झाडांची नावे ओळखणे, निसर्गकवितेवर आधारित चित्रकला स्पर्धा, पथनाटय़ सादर करणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. निसर्गविषयक उपक्रमांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. कुंडीतील रोपांची निगा राखणे, रद्दी कागदापासून पिशव्या बनवणे, शाडूच्या मातीपासून गणपती बनवणे, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, ग्रीन शॉपी – पर्यावरणपोषक वस्तू बनवणे व त्यांचा उपयोग करणे, वर्ल्ड वेट लँड डे, मॅनग्रोव्हज् डे साजरा करणे, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने खाडी-सफारी आयोजित करणे, वन्यजीव, निसर्गविषयक सप्ताह आयोजित करणे, प्रौढांसाठी पर्यावरणविषयक अभ्यासक्रम किंवा कृती सहल आयोजित करणे, खुली पर्यावरण शाळा भरवणे असे उपक्रम मंचातर्फे राबवण्यात येतात.कोतवाल निसर्ग मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेली निसर्गअभ्यास व संवर्धन चळवळ ही प्रामुख्याने अगदी तरुण वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रोत्साहक ठरली. ‘होप’च्या कार्यकालात ती काहीशी परिपक्व बनून प्रौढांच्या जगतात शिरली.

Story img Loader