डोंबिवली: भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकावा आणि त्यांना रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट सामान्याला शुभेच्छा देण्यासाठी येथील ७० ते ८४ वर्ष वयोगटातील ज्येष्ठ मंडळींनी शुक्रवारी डोंबिवली जीमखाना मैदानावर क्रिकेट खेळून भारतीय क्रिकेट संघाला अनोखी मानवंदना दिली.

विश्वचषक सामान्यातील दहा सामाने जिंकून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुजरातमध्ये रविवारी भारत- आस्ट्रेलिया संघांमध्ये होणाऱ्या सामान्यात भारतीय संघाला विजय मिळावा, अशी मनोकामना करून डोंबिवलीतील ज्येष्ठांनी शुक्रवारी डोंबिवली जीमखाना मैदानावर क्रिकेटच्या मॅच खेळल्या.

हेही वाचा… ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात लागू; शहराचा विभागवार पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा बंद राहणार

क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी या ज्येष्ठांना क्रिकेट विषयक आवश्यक सामग्री पुरवली होती. फलंदाजाने टोलवलेला चेंडू पकडताना, त्याला बाद केल्यावर ज्येष्ठ मंडळी मैदानात नाचून आनंद लुटत होती. जीमखाना मैदानावर फिरण्यासाठी आलेली मंडळी या सामन्याचा आनंद घेत होती.
या क्रिकेट संघात डोंबिवलीत ज्येष्ठ उद्योजक मधुकरराव चक्रदेव, राजन धोत्रे, सनदी लेखापाल माधव साने, रवी मोकाशी, अरूण नवरे अशी अनेक मंडळी सहभागी झाली होती. वयाच्या ८४ मध्ये क्रिकेट खेळत असताना या मंडळांनी आपल्या बालपणीचे दिवस आठवत होते.