ठाणे : शहरातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष असल्यामुळे न्यासाच्या वतीने गेला महिनाभरापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आज, शुक्रवारी उपवन तलावावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे यंदा प्रथमच हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसी येथील पंडित खास या आरतीसाठी येणार असून या माध्यमातून ठाणेकरांना गंगाआरतीची अनुभूती मिळणार आहे.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या माध्यमातून गेले २४ वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त शहरात स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा या स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा भव्य स्वरुपात करण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दोन दिवस अगोदर पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. तर, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा वर्षानुवर्षांची आहे. या स्वागता यात्रा निमित्त मासुंदा तलावाच्या भोवताली आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात येते. त्यात, पूर्वसंध्येला करण्यात येणाऱ्या दीपोत्सवामुळे मासुंदा तलाव आणखी आकर्षक दिसत असतो. हे पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरिक येत असतात. परंतू, यंदा या स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष असल्यामुळे श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गेल्या महिनाभरापासून विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यात, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, विद्यार्थीनींसाठी छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण, युवा दौड, ठाणेकरांसाठी विनामूल्य ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ या नाटकाचा प्रयोग, संतांचे सम्मेलन, डॉ. मृदुला दाढे यांचा सांगितीक कार्यक्रम, नृत्यधारा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहे.

या कार्यक्रमांना ठाणेकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. २५ व्या वर्षाच्या निमित्ताने यंदा प्रथमच उपवन तलावावरील घाटावर ठाणेकरांना गंगा आरती अनुभवण्याची पर्वणी मिळणार आहे. वाराणसी येथील पंडित हे स्वतः हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरती याठिकाणी सादर करणार आहेत. सायंकाळी ७ ते ८.३० वाजताच्या दरम्यान ही महाआरती पार पडणार आहे. या गंगा महाआरतीची अनुभुती घेण्यासाठी जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थिती लावावी अशी विनंती न्यासाच्या वतीने करण्यात आली आहे.

उद्या मासुंदा तलावाजवळ गंगा आरती

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दरवर्षी मासुंदा तलावावर दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवाचे एक वेगळेच आकर्षण असते. परंतू, यंदा या दीपोत्सवासह तलावाच्या काठावर गंगा आरती केली जाणार आहे. शनिवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान संपूर्ण मासुंदा तलावाभोवती दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर, ७.३० ते ८.३० दरम्यान हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरती केली जाणार आहे.