ठाणे : देवी मूर्ती विसर्जन मिरवणूक सोहळ्यानिमित्ताने ठाणे शहरात पोलिसांनी मोठे वाहतुक बदल लागू केले आहे. या कालावधीत अवजड वाहनांमुळे कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना शनिवारी दुपारी २ ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत हे वाहतुक बदल लागू केले आहेत. अवजड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे आयुक्तालय क्षेत्र म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते चार आणि रात्री ११ ते पहाटे पाच या कालावधी व्यतिरिक्त इतर वेळेत प्रवेश बंदी असते. उरण येथील जेएनपीटी बंदरातून हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे गुजरात किंवा भिवंडी येथील गोदामांच्या क्षेत्रात वाहतुक करत असतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शनिवारी देवींच्या मुर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अवजड वाहनांना आयुक्तालय क्षेत्रात प्रवेश बंदी लागू केली आहे. दुपारी २ ते देवी मुर्तींचे विसर्जन संपेपर्यंत ही प्रवेशबंदी कायम असणार आहे.

हे ही वाचा… दसऱ्यालाच दिवाळीचा राजकीय बाजार तेजीत

अवजड वाहनांना आयुक्तालयातील सर्वच क्षेत्रात बंदी असेल. त्यामुळे अवजड वाहनांची पुढील मार्गांवरून पर्यायी मार्गे वाहतुक करतील.

गुजरात येथून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने मनोर टेन नाका येथून विक्रमगड, पाली, वाडा, आबिटघर, आटगाव, शहापूर, मुरबाड, कर्जत मार्गे, नवी मुंबई, जेएनपीटी येथे वाहतुक करतील.

नाशिक येथून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने शहापूर, मुरबाड, कर्जत मार्गे, नवी मुंबई जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करतील.

हे ही वाचा… योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई येथून वाहतुक करणारी जड-अवजड वाहने ऐरोली टोलनाका, कर्जत, मुरबाड, शहापूर, वाडा, मनोर टेन नाका मार्गे किंवा जोगेश्वरी विक्रोळी मार्गे, पश्चिम द्रुतगती मार्गे वाहतुक करतील.

नवी मुंबई येथून गुजरात किंवा नाशिकच्या दिशेने वाहतुक करणारी जड अवजड वाहने कर्जत, शहापूर, मुरबाड मार्गे, नाशिक तसेच आटगाव, आबिटघर, वाडा, पाली, विक्रमगड, मनोर टेन नाका मार्गे वाहतुक करतील.