ठाणे- आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मार्च पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. त्यानुसार, आज प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस आहे. ठाणे जिल्ह्यात निवड झालेल्या १० हजार ४२९ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ ६ हजार ३९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार का की, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची या जागेसाठी निवड करणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यातील ६२७ शाळांमधील ११ हजार ३२२ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, ठाणे जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत केवळ ५ हजार ११३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्या संदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्याची माहिती पालकांना दुरध्वनी संदेशाद्वारे दिली जाते. या संदेशाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून त्यामुळेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाही असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला. त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी आणखी वेळ मिळावा याकरिता प्रवेश घेण्याची तारिख १० मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. यासंदर्भातील, माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली होती. त्यानुसार, २८ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत केवळ १ हजार २७८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यातून निवड झालेल्या १० हजार ४२९ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ६ हजार ३९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावरील अहवालातून स्पष्ट होत आहे. निवड झालेल्या ४ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यामुळे आता पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा मुदत वाढवणार की, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची या जागेसाठी निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.