ठाणे : आजच्या काळात अध्यात्म आणि उद्योग हे विरोधाभासी नसून परस्परपूरक आहेत. पूर्वी विद्या आणि पैसे एकत्र येऊ नये असे मानले जात होते. पण, आता या दोघांची सांगड घालणे ही काळाची गरज बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात वेगाने होणाऱ्या बदलांनी हे स्पष्ट केले आहे की, विद्यापीठाइतकेच संशोधन आज उद्योग क्षेत्रातही होत आहे. हे चित्र तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे मत पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ,पुणे यांच्यावतीने डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्ताने ठाणे शहरातील विविध संस्थांनी एकत्रित येऊन नागरी अभिवादन सत्कार समितीच्या वतीने प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार गुरुवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आला.

यावेळी प्रभुदेसाई यांना मानपत्र, शाल, श्रीफळ आणि चांदीची भांडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, चितळे पार्टनर चे श्रीकृष्ण चितळे, सच्चिदानंद शेवडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येकाने मनोगते व्यक्त केली.

डॉ. अनिल काकोडकर पुढे म्हणाले की, रवींद्र प्रभूदेसाई यांचा उद्योजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी नवकल्पनांच्या आधारावर आपल्या उद्योगाला उल्लेखनीय उंची गाठून दिली आहे. उद्योग क्षेत्र हे मूलत: स्पर्धात्मक असते, अशा परिस्थितीत एक छोटा उद्योजक म्हणून त्या क्षेत्रात शिरकाव करणे आणि तिथे टिकून राहणे हे खूप मोठे आव्हान असते. मात्र, प्रभूदेसाई यांनी हे आव्हान समर्थपणे पेलत आपल्या उत्पादनांना जागतिक स्तरावर पोहोचवले आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

तर, आमदार संजय केळकर म्हणाले की, एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे देखील शहराचे नाव मोठे होत असते. निरनिराळे क्षेत्रातील उत्तुंग व्यक्ती या शहरात आहे त्यातील एक व्यक्ती म्हणजे रवींद्र प्रभूदेसाई आहेत. प्रभूदेसाई हे सचोटीने काम करणारे उद्योजक आहेत. फार कमी लोकांमध्ये अहंकारमुक्त नम्रता असते, ती प्रभुदेसाईंमध्ये देखील पाहायला मिळते. उद्योजक हे नेहमी त्रासलेले असतात परंतू, प्रभुदेसाई हे नेहमीच हसतमुख राहिले आहेत. आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, प्रभू देसाई यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मदत केली आहे.

तसेच रवींद्र प्रभूदेसाई यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मला नेहमीच वाटते की मी पितांबरीचे प्रतिनिधित्व करतो. कोणताही ब्रँड तयार होत असताना, व्यक्तीपेक्षा टीमवर्क महत्त्वाचे असते. जिज्ञासा, ज्ञान आणि अनुभव यांच्या साहाय्यानेच उद्योग मोठा होतो. ग्राहक हे देव आणि गृहिणी लक्ष्मी मानल्यामुळेच पितांबरी आज या उंचीवर पोहोचली आहे.