शहराच्या टोलमुक्तीसाठी जनमत एकवटण्याचे प्रयत्न; समाजमाध्यमांवरील चळवळीस दोन लाख नागरिकांचा पाठिंबा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर या परिसरांत जाण्यासाठी वाहनांना भराव्या लागणाऱ्या टोलविरोधात ठाणेकरांनी आता जोरदार मोहीम छेडली आहे. शहरातील टीसा या लघु उद्योजकांच्या संघटनेसोबतच वसई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील औद्योगिक संघटना, व्यापारी, डॉक्टर्स, वास्तुविशारद, सनदी लेखापाल, वकील, ठाणे सिटिझन फोरम अशा विविध संस्था-संघटनांच्या माध्यमांतून ठाणेकरांना ‘टोलमुक्ती’ देण्यासाठी समाजमाध्यमांवर चळवळ उभारण्यात येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यांद्वारे सुरू करण्यात आलेल्या या चळवळीत आतापर्यंत दोन लाखांहून अधिक नागरिकांनी टोलविरोध दर्शवला असून अनेक ठिकाणी मोठमोठी गृहसंकुले या मोहिमेत सहभागी झाली आहेत.

बहुसंख्य ठाणेकर त्यांच्या दैनंदिन कामासाठी मुंबई, नवी मुंबई तसेच इतरत्र जात असतात. त्यात नोकरदार, उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. घोडबंदर परिसरात विकसित झालेल्या नव्या ठाण्यातील बहुतेक नागरिक स्वत:च्या वाहनानेच ये-जा करीत असतात. त्यांना टोलचा सर्वाधिक भरुदड सहन करावा लागतो. सरकारच्या वतीने निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील टोलनाके बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्याप या विषयी कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नसून नागरिकांना टोलचा भरुदड भरावाच लागत आहे. या विरोधात नागरिकांचा दबावगट तयार करण्याची गरज लक्षात घेऊन ठाण्यातील विविध संस्थांनी पुढाकार घेतला. समाजमाध्यमांच्या मदतीने प्रत्येक कुटुंबापर्यंत संपर्क करून याविषयी शासनाला टोलमुक्तीची विनंती करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सह्य़ांची मोहीम, पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून जागृती तसेच प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या दृष्टीने संस्थेने प्रयत्न सुरू केले आहे. टोलमुक्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ िशदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र  कल्याणकर यांच्याकडे या संदर्भात मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

या टोलना विरोध

मुलुंड चेकनाका, आनंदनगर, ऐरोली, खारेगाव, कशेळी, घोडबंदर यासह वेगवेगळ्या शहरांमध्ये टोलनाके असून प्रत्येक ठिकाणी कारला किमान ३५ रुपये टोल भरावा लागतो.

सहभागी संस्था..

स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे, बार कौन्सिल ठाणे, आटेक्ट असोसिएशन, एसएसईए टीटीसी, रोटरी क्लब, इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर अकाऊंट, ठाणे सिटिझन फोरम.

टोलमुक्ती आंदोलनात सहभागी गृहसंकुले..

हिरानंदानी इस्टेट रहिवासी, पार्कवूड गृहनिर्माण संस्था, हिरानंदानी मेडोज, लक्ष्मीनारायण रेसिडन्सी, लोकपुरम हाईट, युनिटी गार्डन, तारांगण कॉम्प्लेक्स, कोरस टॉवर, कोरस नक्षत्र, वसंत विहार कॉम्प्लेक्स, गार्डन इस्टेट, नीलकंठ वूड्स कॉम्प्लेक्स, दोस्ती विहार कॉम्प्लेक्स, सिद्धांचल कॉम्प्लेक्स, रहेजा कॉम्प्लेक्स, प्रस्टेज गार्डन कॉम्प्लेक्स, मोरार आशीष, सेंटर पॉइंट सोसायटी, विजय विलास वेगा, विम्बल्डन पार्क, टाटा ग्लेंडल, वसुंधरा, निहारिका, लोक उपवन कॉम्प्लेक्स, तुलसीधाम कॉम्प्लेक्स, इस्टेट वर्ल्ड कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स या गृहनिर्माण संस्थांमधील लाखो ठाणेकरांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याची माहिती सिटिझन फोरमचे कॅसबर ऑगस्टिन यांनी दिली.

(((    ठाण्यातील संघटनांनी ‘फेसबुक’वरून टोलविरोधी मोहीम चालवली आहे. )

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll issue in thane