किरकोळ बाजारात दर ६० ते ७० रुपये किलोवर
स्वयंपाकाचा अविभाज्य घटक असलेल्या मिरचीपाठोपाठ आता टोमॅटोनेही भाव खाण्यास सुरुवात केली आहे. उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाचा टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाल्यामुळे आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात टोमॅटो ३०-३५ रुपये किलो भावाने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात टोमॅटोने साठी गाठली आहे.
नवी मुंबई व कल्याण येथील घाऊक बाजारपेठेत आवक घटल्याने ही दरवाढ झाली असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव यशवंत पाटील यांनी दिली. उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून नवी मुंबई व कल्याण भागाला टोमॅटोचा पुरवठा होतो. आवक घटली की किरकोळ बाजारातील व्यापारी आपली पोळी भाजून घेत असतात. आताही तसेच घडले असून घाऊकच्या दुप्पट दराने त्यांनी टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. मिरचीप्रमाणे टोमॅटोही अनेक भाज्यांमध्ये वापरला जातो. त्यामुळे अनेक घरांतील भाजी खरेदीमध्ये टोमॅटो अपरिहार्य असतो. कारली, शिमला मिरची, भेंडीचे दर आधीच चढे आहेत. त्यात टोमॅटोनेही अर्धशतक पार केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
कोबी, फ्लॉवरच्या स्वस्ताईचा दिलासा
सांगली, सोलापूरमधून फ्लॉवरची आवक वाढली असल्याने ही भाजी १४ ते १६ रुपये प्रति किलोने विकली जात आहे. कर्नाटकमधून मोठय़ा प्रमाणात कोबी येऊ लागल्याने ही भाजीही १६ ते १७ रुपये प्रति किलोने घाऊक बाजारात उपलब्ध आहे तर किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दराने कोबी आणि फ्लॉवर उपलब्ध आहेत.