ठाणे : शिळफाटा येथे टोरंट कंपनीच्या भूमिगत विद्युत वाहिनीला आग लागल्याने तसेच रोहित्राचा स्फोट झाल्याने एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. धुराचे लोट अधिक असल्याने तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरू असल्याने येथील वाहतुकीस परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली आहे.
शिळफाटा मार्गाखालून टोरंट कंपनीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या आहेत. शुक्रवारी सकाळी अचानक या विद्युत वाहिनीला आणि रोहित्राला आग लागली. या आगीमुळे रोहित्राचा स्फोट होऊन एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विद्युत वाहिनी जळाल्याने येथे मोठ्याप्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. हा मुख्य मार्ग असल्याने ठाण्याहून महापेच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर शिळफाटा ते मुंब्रा बाह्यवळण मार्गापर्यंत कोंडी झाली आहे.