ठाणे : शीळ‌, मुंब्रा आणि कळवा परिसरात वीज चोरीत सापडलेले ग्राहक तसेच थकबाकीदारांना प्रकरण मिटविण्यासाठी भामट्यांकडून संपर्क साधून लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याची बाब टोरंट पाॅवर कंपनीने केलेल्या चौकशीत उघड झाली आहे. टोरंट कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत या भामट्यांकडून पैशांसाठी धमक्या दिल्या असल्याने ग्राहकांचा टोरंट कंपनीविरोधातील रोष वाढू लागला असून या पार्श्वभूमीवर टोरंट कंपनीने अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीळ‌, मुंब्रा आणि कळवा परिसरात टोरंट कंपनीमार्फत वीज पुरवठा आणि वीज देयक वसुलीचे काम करण्यात येते. या कंपनीच्या थकबाकीदारांना हेरून त्यांची आर्थिक फसवणुक करण्याचे प्रकार भामट्यांकडून सुरु झाले आहेत. वीजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन कंपनीने अशा ग्राहकांना दंडासहीत थकबाकीचे देयक पाठविलेले आहे. याशिवाय, काही ग्राहकांनी वीज देयक थकविलेले आहे. अशा ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून मोबाईलवर फोन येत आहेत. त्यात टोरंट कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून प्रकरण मिटविण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केली जात आहे. अशाचप्रकारे मुंब्य्रातील एका महिला ग्राहकालाही फोन आला. त्यात तिला वीज चोरीची थकीत रक्कम भरण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा >>> ठाणे-बोरिवली प्रवास केवळ २० मिनिटांत, भूमीगत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा जारी; पावसाळ्यात कामाला सुरुवात

या रक्कमेत तडजोड करून हे प्रकरण मिटवून देतो. तसे करायचे नसेल तर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल, अशी धमकीही देण्यात आली. त्याची ध्वनीफित सर्वत्र प्रसारित झाल्याने ग्राहकांचा टोरंट कंपनीविरोधातील रोष वाढू लागला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने ग्राहकांवर दबाव आणत असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांकडून करण्यास सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर टोरंट पाॅवर कंपनीने या प्रकरणाची चौकशी केली असून त्यात त्या महीलेला ज्या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता, तो क्रमांक टोरंट पॉवर कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा नसल्याचे समोर आले. तसेच ज्या व्यक्तीसाठी हा फोन नंबर नोंदणीकृत आहे, तो टोरंट पॉवरचा कर्मचारी नसल्याचीही बाब उघडकीस आली. 

हेही वाचा >>> फेब्रुवारीपासून मानखुर्द-ठाणे प्रवास केवळ पाच मिनिटांत

टोरंट कंपनीचा सदस्य असल्याचे सांगून काही भामटे फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येताच कंपनीने ग्राहकांना अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वस्तुस्थितीची पडताळणी न करता टोरंट कंपनीची बदनामी करणाऱ्या ग्रुप आणि त्यांच्या नेत्याविरुद्धही तसेच महिलेला काॅल करणाऱ्यांच्या विरोधात टोरंट कंपनीने पोलिस तक्रार केली आहे.

टोरंट पॉवर शिळ-मुंब्रा-कळवा परिसरातील ग्राहकांनी त्यांच्या वीज संबंधी तक्रारी, अर्ज, देयकांसाठी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीवर विसंबून राहू नये. त्यांनी केवळ टोरंट पॉवर कस्टमर केअर किंवा टोरंट पॉवर वेबसाइट connect.torrentpower.com वर संपर्क करावा. किंवा टोरंट पॉवर हेल्पलाइन १८०० २६७ ७०९९ वर कॉल करू शकतात, असे आवाहनही टोरंट कंपनीने केले आहे. ही कंपनी या क्षेत्रातील महावितरणची फ्रँचायझी आहे आणि महावितरणच्या नियमांना आणि मार्गदर्शक तत्त्वांना बांधील आहे व त्यानुसार काटेकोरपणे काम करत आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torrent power financial fraud of electricity defaulters by scammers ysh
Show comments