मयूर ठाकूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाईंदर : भाईंदरच्या उत्तन, पालीसह गोराई मनोरी आदी सहा गावे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र ही घोषणा कागदावरच राहिली आहे. यासाठी विशेष योजना आखण्यात आली होती.  सहा वर्षांची मुदत उलटूनही काहीच विकास न झाल्याने आता ही गावे पुन्हा महाालिकेत समाविष्ट झाली आहेत.  भाईदरमधील उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी व मोर्वा ही सहा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमधील मनोरी आणि गोराई अशी एकूण आठ गावे मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्रे म्हणून शासनाने घोषित केली होती. हा परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या गावांचा विकास केला जाणार होता. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (एमएमआरडीए) २०१६ ते २०२२ पर्यंत एक विशेष योजना आखण्यात आली होती.

या गावांमध्ये जैवविविधता उद्यान, चित्रनगरी आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात जैवविविधता उद्यानासाठी जागा आरक्षित करून शासनाकडून निधीदेखील उपलब्ध करण्यात आला होता.  योजनेचा कालावधी संपून गेल्यानंतर देखील म्हणावा तसा विकास या ठिकाणी झालेला नाही. दुसरीकडे, या क्षेत्रात राहत असलेल्या ग्रामस्थांना कोणतीही विकासकामे करण्यासाठी एमएमआरडीएची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे येथील गावाचा विकास देखील ठप्प झाला होता. याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर  ही गावे एमएमआरडीएच्या अधिकार ताब्यातून पुन्हा पालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

महापालिकेचा विकास आराखडा   

मीरा-भाईंदर महानगरपालिका नव्याने प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध करण्यात आला आहे. आराखडय़ात उत्तन येथील उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी व मोर्वा अशा सहा गावांचा समावेश नव्हता.  गावे एमएमआरडीएच्या ताब्यात असल्यामुळे हे काम करण्यात आलेले नव्हते. स्थानिकांनी याविरोधात जनआंदोलन केल्यानंतर ही सहा गावे पुन्हा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाने एका सल्लागाराची नेमणूक केली असून ते काम जलद गतीने सुरू असल्याची माहिती  नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी दिली आहे.

मनोरंजन आणि पर्यटन स्थळे उभारण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएसोबत करण्यात आलेला करार हा २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे ही गावी पुन्हा महानगरपालिकेत आली असून त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने उचित पाऊल उचलले जाईल.  –दीपक खांबित, शहर अभियंता, मीरा-भाईंदर महानगरपालिका.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism development of six villages of bhayander only on paper ysh