वसई, डहाणू, पालघरमध्ये पर्यटन केंद्रे उभारणार; पर्यटनस्थळे, निवासस्थानांच्या माहितीसाठी संकेतस्थळ

विस्तीर्ण समुद्रकिनारा, गर्द जंगले, धबधबे, गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे लाभलेल्या पालघर जिल्ह्य़ातील पर्यटन वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील महिन्यात पालघर पर्यटन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वसई, डहाणू, जव्हार आणि पालघरमध्ये पर्यटन केंद्रे उभारण्यात येणार असून जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळे, पर्यटनाची माहिती देणाऱ्या संस्था, निवासस्थाने यांची माहिती देण्यासाठी संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात पालघर पर्यटन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटन उद्योगातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे उद्योजक, व्यावसायिक आणि स्थानिकांना एकत्र आणण्यासाठी आणि पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिखर परिषदेच्या वेळी आणि त्यानंतरही  ‘एक खिडकी परवानगी’ व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

वसई, डहाणू, जव्हार व पालघर येथे पर्यटन केंद्रे (टुरिस्ट सर्किटची) उभारणी करण्यात येणार असून याकामी आर्थिक नियोजन व तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात येणाऱ्या पर्यटकांना जवळपासच्या कोणत्या ठिकाणी पर्यटन करता येईल, त्या ठिकाणची खानपान व्यवस्था, निवास व्यवस्था या संदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधेचा स्तर उंचवण्यासाठी अनेक लहान-मोठी कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

पालघर जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी palghartourism.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्य़ातील विविध पर्यटनस्थळांची माहिती आहे. विविध ठिकाणी असलेली निवासस्थाने, उपाहारगृहे यांची माहिती लवकरच संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. त्याशिवाय पालघर जिल्ह्य़ातील संस्कृतीविषयीही माहिती देण्यात आली आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यटक बुकिंग आणि अन्य सुविधांचा वापर करू शकतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

स्थानिक तरुणांना प्रशिक्षण

पर्यटनस्थळांचा विकास करताना येथील संस्कृतीची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. बांबू हट आणि अन्य निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. स्थानिक बोलीभाषा, राहणीमान आणि संस्कृतीची माहिती पर्यटकांना देण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात येणार आहे.

Story img Loader