थितबी पर्यटन गावात नव्या सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील पहिल्या पर्यटन गावात नवीन वर्षांत पर्यटकांना साहसी खेळांची भेट दिली जाणार आहे. माळशेजच्या पायथ्याशी असलेले थितबी गाव वनविभागातर्फे पर्यटनस्थळ घोषित करण्यात आले आहे. आता या ठिकाणी पर्यटकांना मनोरंजन आणि खेळांचा आनंद देण्यासाठी विविध साहसी खेळांची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या साहसी खेळांचा अनुभव पर्यटकांना देण्यासाठी गावातील स्थानिकांनाच सहभागी करून घेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे वनविभागातर्फे घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी वन विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकाराने माळशेजच्या पायथ्याशी असलेल्या थितबी या आदिवासी गावात पर्यटन ग्राम प्रकल्प साकारण्यात आला आहे. दोन कोटी निधीतून हे खास पर्यटन ग्राम विकसित करण्यात आले आहे. पर्यटन ग्राम प्रकल्पामुळे पर्यटकांना सुरक्षितरीत्या माळशेजच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येत आहे. थितबी इथे पर्यटकांच्या निवासासाठी स्वतंत्र कक्ष, सामूहिक कक्ष, सभा-संमेलनांसाठी सभागृह, तंबूनिवास आणि स्वयंपाकघराची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसराला लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे शनिवार आणि रविवारी येथे पर्यटकांचा ओढा असतो. या ठिकाणी निवांत राहण्यासाठी सुविधा असल्या तरी पर्यटनासाठी गेल्यावर मनोरंजनासाठी कोणतेही साधन नाही. या पाश्र्वभूमीवर ठाणे वन विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकाराने पर्यटकांसाठी साहसी खेळ सुरू करण्यात येणार आहेत. येत्या काही महिन्यांत हे साहसी खेळ पर्यटकांसाठी खुले होणार असून ही पर्यटन पर्वणी ठरणार आहे. या प्रकल्पासाठी गावातील २० ग्रामस्थांची नेमणूक करण्यात येणार असून या माध्यमातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. थितबीतील ग्रामस्थांना नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ माऊंटेनिअरिंग संस्थेतर्फे साहसी खेळांचे रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना साहसी खेळाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वनविभागातून देण्यात आली. माथेरानपाठोपाठ आता थितबी येथेही साहसी खेळांची सोय करण्यात येणार असल्याने नव्याने वसलेल्या या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे.

हे साहसी खेळ

  • झिपलाइन
  • व्हॅली क्रॉसिंग
  • रोप क्लायम्बिंग
  • रोप ब्रिज
  • बरमा ब्रिज
  • नेट कॅनॅपिंग
  • लॅडर क्लायम्बिंग
  • लो रोप क्रॉस

थितबी येथील पर्यटन केंद्रात साहसी खेळ प्रकल्पासाठी ५० लाखांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे.वन विभाग आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या पुढाकाराने साहसी खेळांचा अनुभव पर्यटकांना घेता येईल.    – डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे वन विभाग