बोटसफारी, पक्षीनिरीक्षण आणि जैवविविधतेचा अनुभव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींना खाडीकिनारी असलेली जैवविविधता प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी वन विभागाने ऐरोली येथे आखलेल्या बहुचर्चित पर्यावरण पर्यटन केंद्राच्या (इको टुरिझम सेंटर) कामासाठी येत्या मार्च महिन्याचा मुहूर्त आखण्यात आला आहे. जर्मनी येथील तज्ज्ञ कंपनीच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बोटिंग, पक्षिनिरीक्षण आणि जैवविविधतेची माहिती देणारी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ठाणे खाडी परिसराला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा मिळाला असतानाच, आता ऐरोलीतही पर्यटन केंद्र उभे राहणार असल्याने येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

बोटीच्या माध्यमातून खाडी सफर, दृक्-श्राव्य माध्यमातून पक्षिनिरीक्षण, जैवविविधतेविषयक माहिती असा खाडीजीवनाचा अनुभव देणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश या केंद्रात करण्यात आला आहे. ठाणे खाडी परिसरात थंडीच्या दिवसांत मोठय़ा प्रमाणात दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यामुळे खाडीकिनारा रंगीबेरंगी पक्ष्यांनी बहरतो. मोठय़ा संख्येने खाडीकिनारी वास्तव्य करणाऱ्या फ्लेिमगो पक्ष्यामुळे ठाणे खाडी किनारपट्टीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा प्राप्त करून देण्यात आला आहे. या परिसरातील जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. या पाश्र्वभूमीवर पर्यटकांना सुनियोजनातून जैवविविधतेचा अनुभव घेता यावा यासाठी कांदळवन विभागातर्फे हे पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. ऐरोली येथील वनविभागाच्या हद्दीतील काही कांदळवन विभाग जोडून २५ एकरच्या जागेत पर्यटकांसाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे.

वनविभागाच्या अंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कांदळवन विभाग मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी दिली.

रात्रीची जैवविविधता, देवमाशाचा सांगाडा

या पर्यटन केंद्रात बॅटरीच्या साहाय्याने रात्रीची जैवविविधता अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. सुरुवातीला संपूर्ण काळोख असलेल्या खोलीत गेल्यावर बॅटरीच्या साहाय्याने खारफुटीची रोपे, खाडीतील जैवविविधता, पक्षिजीवन पर्यटकांना पाहता येणार आहे. कालांतराने पर्यटन केंद्राच्या ठिकाणी देवमाशाचा सांगाडा प्रदर्शनात ठेवण्यात असल्याची माहिती कार्यक्रम अधिकारी भास्कर पॉल यांनी दिली.

पक्ष्यांच्या चित्रांसोबत आवाजांचीही माहिती

पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजना या प्रकल्पात आखण्यात आल्या आहेत. खारफुटीविषयक माहितीच्या भित्तिपत्रकासोबत विविध जातींच्या पक्ष्यांचे चित्र स्क्रीनवर दिसणार आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या पक्ष्याचा आवाज कसा आहे हे जाणून घ्यायचे असल्यास त्या पक्ष्यावर आपल्या बोटाने स्पर्श केल्यास संबंधित पक्ष्याचा आवाज पर्यटकांना कळेल, अशी सोय या उपक्रमात करण्यात आली आहे.

मुंबई, ठाण्यातील पर्यावरणप्रेमी पर्यटकांसाठी अभ्यासपूर्ण खाडीकिनाराचे दर्शन व्हावे यासाठी हे पर्यटन केंद्र तयार करण्यात येत आहे. ठाणे खाडीकिनाऱ्याला फ्लेमिंगो सेंच्युरी जाहीर झाल्यापासून पर्यटकांचा ओढा कायम या ठिकाणी असतो. पर्यटन केंद्राचा खाडीकिनारी पक्षिनिरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना निश्चितच फायदा होईल.

एन. वासुदेवन, मुख्य वनसंरक्षक – कांदळवन विभाग