एरवी टीएमटीच्या बसची पायरी चढताना नाके मुरडणाऱ्या प्रवाशांनी येऊर पर्यटनासाठी स्वस्त पर्याय निवडला आहे. वनविभागाने पर्यटन शुल्कात वाढ केल्याने हिरवीगर्द वनराई अनुभवण्यासाठी तब्बल ४० रुपये मोजावे लागत आहेत. चारचाकी वाहनांसाठी हा दर १०० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथून येणाऱ्या प्रवाशांनी येऊरच्या पायथ्याशी येऊन नंतर मग टीएमटी बसने वर जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे सध्या या मार्गावरील टीएमटी बस फुल भरून जात आहेत.
येऊरच्या जंगलात फेरफटका मारण्यासाठी वनविभागाने पर्यटन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेताच पर्यटकांनीही येथील हिरव्यागर्द वनराईचा आस्वाद घेण्यासाठी नव्या पळवाटा शोधण्यास सुरुवात केल्या आहेत. वनविभागाच्या नव्या दरपत्रकानुसार येऊर प्रवेशासाठी एका व्यक्तीला ४० रुपयांचा खर्च येणार आहे. चारचाकी वाहन घेऊन तुम्ही येऊरला निघालात तर किमान शंभराची एक नोट खर्च होणार हे नक्की. हे लक्षात घेऊन पर्यटकांनी येऊरच्या पायथ्याशी वाहन उभे करत ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसने येऊरची वेस ओलांडण्याची युक्ती लढवली आहे. पायथ्यापासून अवघ्या आठ रुपयांचे तिकीट काढले की येऊरचे टोक गाठता येते. शिवाय त्यासाठी पर्यटन शुल्क लागत नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच वेगवेगळ्या भागांतून येऊरच्या सहलीसाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांनी टीएमटी सफरीची स्वस्त पळवाट शोधून काढली आहे. वनविभागाने नुकतेच जारी केलेल्या नवीन शुल्क दरपत्रकानुसार नागरिकांना येऊर प्रवेशासाठी प्रत्येक व्यक्तीला ४० रुपये तर दुचाकीसाठी ३४ रुपये आणि कारसाठी १३३ रुपये मोजावे लागणार आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येत असलेल्या येऊरच्या जंगलात फेरफटका मारण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
समीर पाटणकर, ठाणे

‘स्थानिक फायदा’
ठाणे शहरातील अनेक नागरिक सकाळी फिरण्यासाठी येऊरच्या जंगलात येतात. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. येऊरमधील हॉटेल, फार्म हाऊस आणि बंगल्यांमध्ये पाटर्य़ा झडतात. त्यामुळे येथे वाहनांची सतत वर्दळ असते. शुल्क दरात दहा टक्के वाढ करून नवीन सुधारित दरपत्रक जारी केले आहे. टीएमटीच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही आणि या बसगाडय़ांचे तिकीट जेमतेम ८ ते १५ रुपये इतके आहे.

प्रवेश शुल्क                                      
प्रौढ- ४० रुपये
मोटारसायकल, रिक्षा- ३४ रु.
कार व जीप- १३३ रुपये
ट्रक व बस- २०० रुपये
बस तिकीट दर
 भूकेंद्र (येऊर प्रवेशद्वार)- ८ रु.
 वर्तकनगर- ११ रुपये
 जांभळी नाका- १३ रुपये
 ठाणे रेल्वे स्थानक- १५ रुपये   

Story img Loader