पक्षी निरीक्षणाच्या चार महिन्यांत १२ लाखांचा नफा
ठाणे : विस्तीर्ण अशा ठाणे खाडीतील जैवविविधतेचा अनुभव पर्यटकांना मिळावा यासाठी राज्य सरकारने दिवा-ऐरोलीच्या खाडीकिनाऱ्यांवर सुरू केलेल्या अधिकृत बोट सफरीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांमधील पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पावसामुळे सध्या ही सेवा बंद आहे. मात्र गेल्या डिसेंबर, जानेवारी महिन्यात सफरीच्या माध्यमातून १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ठाण्याच्या खाडीकिनारी खासगी बोटचालकांचे लोण
फोफावत असताना शासनानेच या उद्योगात उडी घेतल्याने पर्यटकांनीही शासकीय बोट सफरीस आपलेसे केले आहे.
शासनाच्या कांदळवन विभागातर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या खाडी सफरीचा आनंद पर्यटकांना अनुभवता येणार असल्याने पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमींमध्ये या बोट सफरीविषयी विशेष उत्सुकता होती. खाडीकिनारी जमणारे फ्लेमिंगो, इतर जातीचे पक्षी न्याहाळणे याचे पर्यटकांना विशेष आकर्षण असते. ही बोट सफर दिवा जेटी येथून सुरू होत असल्याने ठाणेकरांसाठी सुट्टीच्या दिवशी ही ही खास पर्वणी ठरली आहे. खाडीकिनारी पक्षी निरीक्षणासाठी पर्यटक, पक्षी अभ्यासकांचा ओढा वाढत असताना या ठिकाणी खासगी बोटचालक मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ही मंडळी पुरेशी खबरदारी घेत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. त्यामुळे शासनाच्या कांदळवन विभागाने स्थानिक कोळी समाजातील व्यावसायिकांना एकत्र करून ऑक्टोबर महिन्यापासून बोट सफरीचा प्रयोग सुरू केला. पार्टिसिपेटरी इको टुरिझम प्लॅन रुल्स अँड रेग्युलेशन या योजनेच्या या खाडीकिनारी राहणारे कोळीबांधव पर्यटकांना खाडीकिनारची जैवविविधता समजावून सांगतात.
संकेतस्थळाचे काम पूर्ण झाल्यानंतर बोट सफरीची पूर्वनोंदणी करता येणार असल्याचे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले.
कांदळवन, जैवविविधता, विविध पक्षी यांची माहिती होणार आहे. त्यासाठी शासनातर्फे अधिकृत तिकीट आकारले जाते. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात येत आहे. स्थानिक कोळ्यांनाच यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे, नवी मुंबईतील पर्यटकांचा या बोट सफरीसाठी प्रतिसाद लाभला आहे.
– एन. वासुदेवन ( मुख्य वनसंरक्षक, कांदळवन विभाग)
चार महिने ठाण्याच्या खाडीकिनारी फ्लेिमगो तसेच परदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. यंदा फ्लेिमगो पक्षी उशिरापर्यंत या खाडीकिनारी रमले असले, तरी फेब्रुवारी महिन्यानंतर पक्ष्यांचे प्रमाण कमी होते. ऑक्टोबर महिन्यात दिवा जेटी येथून सुरू होत असलेल्या २८ जागांच्या बोटीसाठी ५०० रुपये तर सुट्टीच्या दिवशी ६०० रुपये आकारण्यात येतात. आठ जागांच्या एका बोटीसाठी इतर दिवशी ५ हजार आणि सुट्टीच्या दिवशी ६ हजार रुपये शुल्क आहे. शुक्रवारी आणि भरतीच्या वेळी बोट सफर बंद असते.
– मयूर बोथे, ऐरोली वनपरिक्षेत्र अधिकारी