आशीष धनगर

जागोजागी उभारलेले मोहल्ला क्लिनिक, खासगी डॉक्टरांची उभी केलेली साखळी, एका बाधितामागे किमान दहा संशयितांचे विलगीकण आणि चाचण्यांमध्ये वाढ यांमुळे भिवंडी, मुंब्रा, उल्हासनगरसारख्या अतिसंक्रमित भागांतील करोना नियंत्रणात येऊ लागला आहे. डॉ. विपीन शर्मा, डॉ. पंकज आशिया आणि डॉ. राजा दयानिधी या वैद्यकीय पार्श्वभूमी लाभलेल्या आयुक्तांच्या आखणीला याचे श्रेय असल्याचे मानले जाते.

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधील करोनाबाधितांचा आकडा हाताबाहेर गेल्याने राज्य सरकारने दीड महिन्यांपूर्वी कल्याण -डोंबिवलीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमधील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवे अधिकारी शक्यतो वैद्यकीय पार्श्वभूमीचे असावेत, यावर सरकारचा भर राहिला.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून मुंब्रा, भिवंडी आणि उल्हासनगर ही शहरे अतिसंक्रमित होती. भिवंडीत  मृतांचा आकडा मोठा होता. शिवाय मुंब्रा, भिवंडीत लक्षणे दिसत असूनही संशयित रुग्ण चाचणीसाठी पुढे येत नसल्याने प्रशासनापुढील डोकेदुखी वाढू लागली होती. गेल्या महिनाभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर मात्र या तिन्ही अतिसंक्रमित क्षेत्रातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या घटू लागल्याचे दिसत आहे.

मालेगावनंतर डॉ. आशिया यांचा ‘भिवंडी पॅटर्न’

मालेगाव येथील करोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावलेले डॉ. पंकज आशिया यांनी गेल्या महिनाभरात भिवंडीतही आयुक्त म्हणून करोना नियंत्रणाचा नवा पॅटर्न उभा केला आहे. शहरात आधी जेमतेम ५० ते ६० च्या आसपास होणाऱ्या करोना चाचण्यांची संख्या अवघ्या काही दिवसांत ६०० पर्यंत वाढविण्यात आली. लक्षणे असूनही करोनाच्या भीतीमुळे चाचणीस टाळाटाळ करणाऱ्यांचे प्रमाण भिवंडीत अधिक होते. येथील अल्पसंख्याक समाजात विश्वास निर्माण व्हावा यासाठी शहरातील स्थानिक डॉक्टर आणि नगरसेवकांची मदत घेण्यात आली. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये ३३ ठिकाणी मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात आले. महापालिका आणि खासगी रुग्णालयांच्या मदतीने ६०० ऑक्सिजन खाटा आणि ७० व्हेंटीलेटर खाटांची आरोग्य व्यवस्था उभारली. एका रुग्णामागे १० ते १२ जणांचे सक्तीचे विलगीकरण करण्यात आले. शिक्षक, नगरसेवक आणि काही ठिकाणी मौलवींची मदत घेत संक्रमित भागांमध्ये सर्वेक्षण वाढवण्यात आले. या प्रभावी उपायांमुळे येथील रुग्णांच्या संख्येत घट झाली. गेल्या पंधरवडय़ापासून शहरात दिवसाला २० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील मृतांची संख्याही घटली आहे. शहरात आतापर्यंत ३ हजार ७८९ नागरिकांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी ३ हजार ३११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ८७.३८ टक्के इतके आहे.

 

मुंब्रा, उल्हासनगरमध्ये प्रभावी नियंत्रण

उल्हासनगरात आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्यावर भर दिला. त्यासाठी विलगीकरणात अतिरिक्त खाटांची व्यवस्था त्यांनी उभी केली. शहरातील खासगी रुग्णालयांमधील खाटा विलगीकरणासाठी आरक्षित करण्यात आल्या. सध्या येथे प्रतिजन चाचणीच्या माध्यमातून प्राथमिक पातळीवरच रुग्णांना शोधले जात असल्याने संक्रमण कमी झाल्याचा दावा पालिकेकडून केला जातो आहे. संपर्कातील व्यक्तींची संख्याही कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंब्रा परिसर सुरुवातीपासूनच अतिसंक्रमित ठरला होता. करोना काळातही येथे भरणारा गुलाब बाजार समाजमाध्यमांवर टीकेचा विषय ठरला होता. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन ताप तपासणी करून रुग्णांचा शोध घेण्याची योजना आखली. यामध्ये अनेकजण भीतीपोटी खरी माहिती देत नसल्याने परिसरात प्रादुर्भाव वाढतच होता. त्यामुळे मुंब्य्रात खासगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांच्या संघटनेची मदत घेण्यात आली. तापाचे रुग्ण दवाखान्यात आल्यास त्याची माहिती तातडीने आम्हाला द्यावी, अशी सूचना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली. त्यासाठी मुंब्य्रात ८३ खासगी डॉक्टरांची फळी उभारण्यात आली. या डॉक्टरांच्या मदतीने रुग्णशोध आणि विलगीकरण वेगाने शक्य झाले. गेल्या आठवडय़ात सलग दोन दिवस मुंब््रयात शून्य रुग्णसंख्या होती. याठिकाणी दिवसाचा आकडा पंधरवडय़ापासून दहापेक्षा कमी आहे.

भिवंडीत रुग्णशोध मोहीम मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात आली. भाजी विक्रेते, दुकानदार, सफाई कामगार आणि पोलीस आदींच्या प्रतिजन चाचण्या करण्यावर आम्ही भर दिला. आता शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे.

-डॉ. पंकज आशिया, आयुक्त, भिवंडी महापालिका