भगवान मंडलिक
मागील वर्षभरापासून न्यायालयीन प्रक्रिया, काही शासनाकडील तक्रारींमुळे ठाणे जिल्ह्यातील ३८ टोईंग व्हॅन बंद होत्या. टोईंग व्हॅन बंद झाल्यापासून दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर कोठेही उभी करण्याची वाहन मालकांमध्ये स्पर्धा लागली होती. डोंबिवली, कल्याण परिसरात गेल्या दीड वर्षापासून सर्वाधिक वाहन कोंडी या बेशिस्त वाहने लावण्याच्या पध्दतीमुळे होत आहे. आता टोईंग व्हॅन सुरू होणार असल्याने रस्ते मोकळे राहण्या बरोबरच बेशिस्त वाहन चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. डोंबिवलीतील वाहन चालकांनी काळजी घेऊन मंगळवार पासून आपली वाहने उभी करावीत, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरात एकूण ३८ टोईंग व्हॅन ( ना वाहनतळावर उभे केलेले खेचून नेणारे वाहन) प्रस्तावित आहेत. टोईंग व्हॅनच्या भीतीमुळे नागरिक आपले वाहन उचलून नेले जाणार नाही या भीतीने सुरक्षित ठिकाणी, वाहनतळावर वाहन उभे करुन मग बाजारपेठेत खरेदीला जात होते. डोंबिवली, कल्याण मधील बहुतांशी रस्ते अरुंद. अशा रस्त्यांवर वाहन मालक चारचाकी, दुचाकी वाहन उभे करुन वाहतुकीला अडथळा करत होते.
वर्षापासून वाहन बंद
वाहतूक विभागाच्या टोईंग वाहन वापरा विषयी काहींनी शासनाकडे तक्रारी, न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. टोईंग व्हॅ्न या वाहन वापर संपलेल्या मुदतीमधील आहेत. त्यांना उपप्रादेशिक परिवहन विभागाची मान्यता नाही. या तक्रारींमुळे वाहतूक विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्व टोईंग व्हॅन गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये बंद केल्या. या वाहनावर काम करणारे जिल्ह्यातील सुमारे २०० कामगार बेघर झाले. टोईंग वाहन मालकांची आर्थिक कोंडी झाली.टोईंग वाहन शहरात फिरत नाही कळल्यावर डोंबिवली मध्ये वाहने कोठेही उभे करण्याची एक स्पर्धा वाहन मालकांमध्ये सुरू झाली. शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ली बोळात वाहतूक पोलीस जाणे शक्य नसल्याने त्याचा गैरफायदा वाहन चालक घेऊ लागले. कोठेही वाहन उभे करुन वाहन कोंडीला अडथळा करू लागले. वाहतूक पोलिसाच्या एखादे वाहन निदर्शनास आले तर ते त्या वाहनाचा ई चलान पध्दतीने मोबाईल मध्ये फोटो काढून त्याला दंडात्मक पावती ऑनलाईन पाठवत होते. दंडाची कारवाई झाली तरी वाहन रस्त्यावरच उभे राहत असल्याने रस्त्यावरील कोंडी कायम होती.
कारवाई सुरू होणार
डोंबिवली पूर्व-पश्चिम भागासाठी काही दिवस एकच टोईंग व्हॅन रस्त्यावर बेशिस्तीने उभी केलेली वाहने उचलण्याचे काम करणार आहे. दुसरे वाहन पंधरा दिवसांनी डोंबिवली वाहन विभागात दाखल झाले की डोंबिवली पूर्व, पश्चिम भागासाठी दोन स्वतंत्र टोईंग व्हॅन कार्यरत राहणार आहेत. टोईंग व्हॅन मार्फत कारवाई सुरू झाली की वाहन चालकाला घटनास्थळावरुन वाहतूक विभाग आणि तेथून वाहन कारवाई केंद्रावर जाऊन दंड रक्कम भरुन मग वाहन ताब्यात घ्यावे लागते. ही डोकेदुखी टाळण्यासाठी वाहन चालक वाहन टोईंगची कारवाई होणार नाही याची काळजी घेतात. मंगळवारपासून डोंबिवली पूर्व पश्चिम भागात टोईंग व्हॅन सुरू होणार असल्याने वाहन चालकांना वाहने उभी करताना काळजी घ्यावी लागणार आहे.
कोंडीचे रस्ते
डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानक भागातील के. बी. विरा शाळा समोरील शहीद भगतसिंग रस्ता, आगरकर रस्ता, नेहरु रस्ता, रामकृष्ण हाॅटेल गल्ली, फडके रस्ता, टंडन रस्ता, डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानका जवळी भावे सभागृह ते कोपर पूल रस्ता.