कल्याण परिसरातील बाजारपेठ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या चोऱ्या रोखण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे. या भागात वाहतुकीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. या पाश्र्वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील जुन्या बाजारपेठेतील विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात शनिवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका अधिकारी, बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठ परिसरात असलेल्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे; तर काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि व्यापारी वर्गाच्या सुरक्षिततेसंबंधी उपस्थितांना विविध सूचना केल्या. शक्य झाल्यास प्रत्येक व्यापाऱ्याने दुकानात सीसीटीव्ही बसविणे, सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणे, संशयास्पद व्यक्तींची माहिती वेळोवेळी पोलिसांना कळविणे आदी सूचनांचा समावेश होता. तसेच या परिसरातील वाहतूक कोंडी ही देखील एक महत्त्वाची समस्या असून त्यासाठी व्यापारी, शाळा व्यवस्थापन, नागरिक यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. रस्त्यावर पार्किंगसाठी वेगळी नियमावली लागू केली जाणार आहे. याची माहिती व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांस देणे आवश्यक आहे. यामुळे प्रवासी वर्गासही पार्किंगची एक चांगली शिस्त लागेल. शाळेच्या बसेससाठी शाळा व्यवस्थापनाने शाळा परिसरातच योग्य ती व्यवस्था करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सूर्यवंशी यांनी यावेळी दिला. सर्व व्यापारी वर्गाने एकत्र येऊन इथल्या प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी यावेळी केले. दरम्यान यावेळी व्यापारी, शिक्षक प्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी आपल्या विविध समस्या आणि अडचणी पोलिसांसमोर कथन केल्या. या समस्यांवर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन बाजारपेठ पोलिसांनी यावेळी दिले.