हस्तकला
महाराष्ट्रातील वस्त्रनिर्मिती विश्वात भिवंडीतील यंत्रमागांचे मोठे योगदान असले तरी ज्याला ठाण्याचा म्हणता येईल, असा कोणताही विशिष्ट पोशाख नाही. उलट सांस्कृतिकदृष्टय़ा अतिशय समृद्ध असलेले हे शहर कापड खरेदीसाठी अगदी अलीकडच्या काळापर्यंत पूर्णपणे मुंबईवर अवलंबून होते. फारसे पर्याय नसल्याने ग्राहक नाहीत आणि ग्राहक नसल्याने दुकानात विविध प्रकारची वस्त्रे नाहीत, अशी ठाण्यातील कापड बाजाराची वस्तुस्थिती होती. कारण किरकोळ गरजेच्या वस्त्रांचा अपवादवगळता सणा-समारंभानिमित्त केली जाणारी अथवा लग्नसराईची विशेष खरेदी हमखास मुंबईहून केली जाई. त्यातही दादरला खास प्राधान्य दिले जात असे. त्यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी शहरांमधील कापड बाजार काहीसा थंड होता. दोन दशकांपूर्वी मात्र ही परिस्थिती हळूहळू बदलली. आता तर ठाण्यातील कापड बाजार मुंबईच्या तोडीस तोड आहे. किंबहुना काही बाबतीत मुंबईपेक्षा कांकणभर सरस आहे. येथील बाजारपेठेत देशभरातील विविध प्रकारचे पेहेराव मिळतात. त्यामुळे आता अगदी मुंबईतील अनेक चोखंदळ ग्राहकही ठाण्यात कपडे खरेदीसाठी येतात. ‘वस्त्र खरेदीचे ठाणे’ या अवस्थेप्रत या शहराला लौकिक मिळवून देणाऱ्यांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे ‘हस्तकला’.
भारतातील निरनिराळ्या प्रांतांत लोकप्रिय असलेल्या साडय़ा, ड्रेस मटेरियल्स पूर्वी ठरावीक ठिकाणी नियमित मिळण्याची सोय नव्हती. दिवाळी अथवा नाताळात भरणाऱ्या प्रदर्शनात अशा प्रकारच्या साडय़ा, ड्रेस मटेरियल्स मिळत होते. मात्र त्याच्या गुणवत्तेबाबत खात्री देता येत नव्हती. प्रवीण छेडा यांनी ही गरज ओळखून २२ वर्षांपूर्वी ठाण्यात गोखले रोडवर ‘हस्तकला’ नावाने साडी विक्री केंद्र सुरू केले. त्यावेळी प्रचलित असणाऱ्या कापड विक्री दुकानांऐवजी त्यांनी त्याला छान आखीव-रेखीव दालनाचे रूप दिले. त्या दालनात त्यांनी भारतातील विविध प्रांतांतील हस्त कारागिरांनी विणलेल्या साडय़ा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. त्या त्या प्रांतातील कारागिरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून साडय़ा मागवून घेतल्या.
कारागिरांना नियमित कामाचा तसेच ग्राहकांना गुणवत्तेचा असा दुहेरी विश्वास देण्याचे काम ‘हस्तकला’ने केले. त्यामुळे अल्पावधीच ‘हस्तकला’ची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली. पूर्वी ठाण्यातील नागरिक लग्न-समारंभ अथवा विशेष खरेदीसाठी मुंबईला जात. आता पुणे, नाशिक मुंबईतील घाटकोपर,कुर्ला, दादर भागातून ग्राहक खास ‘हस्तकला’च्या दुकानांत येऊ लागले आहेत.
‘हस्तकला’ने केवळ ठाणेच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध भागांतील चोखंदळ ग्राहकांची पसंती मिळवली आहे. १९९४ मध्ये ठाण्यात ‘हस्तकला’चे पहिले दालन सुरू झाले. सध्या फक्त ठाण्यात तब्बल आठ दालने आहेत. त्यातील चार गोखले रोडवर तर प्रत्येकी दोन व्हिव्हियाना आणि कोरम मॉलमध्ये आहेत. डोंबिवलीत तीन दुकाने आहेत. मुंबईत जुहू येथेही हस्तकलाचे दालन आहे. नाशिक, पुणे येथूनही ग्राहक ‘हस्तकला’मध्ये येतात. साडय़ा आणि ड्रेस मटेरिअल्ससाठी स्वतंत्र दालने आहेत. लवकरच मुंबईतील सर्व मॉल्समध्ये हस्तकलाचे किमान एक दालन उभारण्याची योजना असल्याची माहिती प्रवीण छेडा यांनी दिली.
ब्रॅण्ड ठाणे : पारंपरिक वस्त्र आणि आभूषणांची देखणी दुनिया
ठाणे' या अवस्थेप्रत या शहराला लौकिक मिळवून देणाऱ्यांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे ‘हस्तकला'.
Written by प्रशांत मोरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-02-2016 at 01:45 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional apparel and designers jewellery