अनघा ढोमसे
सारेगमप रिअॅलिटी शोच्या २००७मधील पर्वात सहभागी झालेली गायिका अनघा ढोमसे अस्सल ठाणेकर आहे. नुकताच तिचा ‘पाऊस उन्हाचा वैरी’ हा अल्बम प्रदर्शित झाला असून लवकरच तिचा सिंगल्सचा व्हिडिओ येणार आहे. पं. अच्युत जोशी, पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर अनघा ढोमसे सध्या पं. श्रीकांत वायकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे.
’आवडते चित्रपट : बालक पालक, टाइमपास, बालगंधर्व, नटरंग, जिंदगी ना मिलेगी दोबारा, इंटरस्टेलार.
’आवडतं नाटक : व्हाइट लिली नाइट रायडर
’माझं आवडतं गाणं : ‘हळुवार अंतरीच्या छेडीत सर्व तारा.’ गुरू ठाकूर लिखित गाणं.
’आवडते संगीतकार : मदन मोहन, आर. डी. बर्मन, ए. आर. रेहमान.
’आवडता वादक : सारेगमपमध्ये गाणी सादर करतानाचे सगळेच वादक.
’गाण्यातला आवडता जॉनर : रोमॅण्टिक, भक्तिसंगीत प्रकार मला अधिक भावतो.
’आवडते गायक-गायिका : कुमार गंधर्व, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले
’शॉपिंगचं आवडतं ठिकाण : राममारुती रोडवरील दुकानं आणि अर्थातच विवियाना मॉल
’आवडता फूडजॉइण्ट : मामलेदारची मिसळ, दुर्गा स्नॅक्सचा वडा आवडतो. याचं कारण शाळेत असल्यापासून ठाण्यात फिरायला बाहेर पडलं की या दोन ठिकाणी आवर्जून जाऊन मिसळ आणि वडा खायचाच हे ठरलेलंच असायचं.
’ठाणे शहरातील आवडतं ठिकाण : उपवन तलाव आणि तिथलं गणपतीचं देऊळ. परीक्षा आली की मित्र-मैत्रिणींसोबत जाऊन त्या गणपतीचं दर्शन आवर्जून घ्यायचे. खरेतर अलीकडे काही कारणांमुळे उपवन तलाव हे ठिकाण काहीसं बदनाम झालं आहे हे खरं आहे. परंतु, मित्र-मैत्रिणी असोत वा कुटुंबीय असो, तुम्ही उपवन तलावाच्या ठिकाणी जाऊन तिथल्या नीरव शांततेत बसून रिलॅक्स फील करू शकता. वैयक्तिकरीत्या मला उपवन तलाव आणि तिथलं गणपतीचं देऊळ खूप खूप आवडतं, इतकंच सांगू शकते.
’ठाण्याची विशेष लक्षात राहिलेली, अनुभवलेली संस्मरणीय गोष्ट : मी अस्सल ठाणेकर आहे. जन्म ठाण्याचा आहे, तसंच माझा पहिला परफॉर्मन्सही योगायोगाने ठाण्यातच झाला. कायमचा स्मरणात राहिलेला अनुभव सांगायला मला नक्कीच आवडेल. सहावी-सातवीत शिकत असताना मी पद्मजा फेणाणी-जोगळेकर या माझ्या गुरूंकडे शिक्षण घेत होते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने त्यांचा ‘मंगलदीप’ हा संगीतमय कार्यक्रम गडकरी रंगायतनमध्ये होता. त्यामुळे साहजिकच आई-बाबा मला कार्यक्रमाला घेऊन गेले. दोन-चार गाणी गायल्यानंतर अचानक पद्मजाताईंनी मला स्टेजवर बोलावले. घाबरत घाबरत मी स्टेजवर गेले आणि त्यांनी ठाणेकर प्रेक्षकांना माझी ओळख करून दिली, नाव सांगितले आणि ही मुलगी आता एक गाणं सादर करणार आहे, असं त्यांनी माइकवरून जाहीरही केलं. सारेगमप रिअॅलिटी शोमधून लोकांसमोर येण्यापूर्वीचा तो माझा पहिला परफॉर्मन्स आणि ठाणेकर रसिकांनी माझ्या गाण्याला दिलेली उत्स्फूर्त दाद मी कधीच विसरू शकणार नाही. आणखी एक विशेष म्हणजे दिवाळी पहाटच्या त्या कार्यक्रमाचे वृत्त दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात आले, त्यातही माझ्या गाण्याची दखल घेण्यात आली होती हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. गुढीपाडव्याला होणारी नववर्ष स्वागतयात्राही मला खूप आवडते. आजचे ठाणे हे सांस्कृतिकदृष्टय़ा परिपक्व आहेच, त्याचबरोबर मॉल संस्कृतीही इथे रुजत चालली आहे. सांस्कृतिक गोष्टी आणि मॉल संस्कृतीसारख्या नव्या गोष्टी हातात हात घालून ठाणेकर स्वीकारतात हेही ठाण्याचं खास वैशिष्टय़ आहे, असं मला वाटतं.
शब्दांकन : सुनील नांदगावकर
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2015 रोजी प्रकाशित
पारंपरिक संस्कृती आणि मॉल कल्चर!
सारेगमप रिअॅलिटी शोच्या २००७मधील पर्वात सहभागी झालेली गायिका अनघा ढोमसे अस्सल ठाणेकर आहे. नुकताच तिचा ‘पाऊस उन्हाचा वैरी’ हा अल्बम प्रदर्शित झाला असून लवकरच तिचा सिंगल्सचा व्हिडिओ येणार आहे.
First published on: 24-01-2015 at 12:39 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional culture and mall culture