नेहमीच्या धावपळीत साध्या आणि सुटसटीत कपडय़ांना प्राधान्य दिले जात असले तरी निवांत पार्टी अथवा सभा-समारंभांमध्ये पोशाखी अवस्थेत वावरणे अनेकजण पसंत करू लागले आहेत. अशा पोशाखी पेहेरावात मग चप्पल अथवा बूटांपेक्षा पायात अधिक रूबाबदार दिसणारी मोजडी मोठय़ा प्रमाणात घातली जाते. मोगलकालीन राजेशाहीतील ही जूती सध्याच्या पादत्राण विश्वातही आपले वैशिष्टय़पूर्ण स्थान टिकवून आहे..
मोजडी हा पारंपारिक पादत्राणाचा प्रकार आहे. मुघल साम्राज्यातील राजा सलीम शाह याला मोजडी हा पादत्राणाचा प्रकार आवडत असे. त्यामुळे मोजडीला सलीमशाही असेही संबोधले जाते. मोजरी, मोजडी किंवा जुत्ती या नावाने ओळखली जाणारी मोजडी घातल्यानंतर राजेशाही थाटाची आठवण झाली नाही तरच नवल. महाराष्ट्रात लग्न, मुंज, गुढीपाडवा आदी महत्त्वाच्या सणांना मोजडीचा हमखास वापर केला जातो. मोजडी साधारणत: चामडय़ापासून बनविली जाते. सुंदर कोरीव काम, धाग्याची नक्षी, मणी आदींनी मोजडी एक आकर्षक रुप धारण करते. पारंपरिक राजस्थानी मोजडी तरुण-तरुणांना आकर्षित करते. राजे महाराजे यांनी घातलेल्या मोजडींना युवावर्गातून मोठी मागणी आहे. जुन्या काळातील या मोजडीला फॅशनच्या जमान्यातही चांगले दिवस आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल जशी सर्वाना भुरळ घालते, तशाच प्रकारे राजस्थानी मोजडीची जादू दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतीयांसह विदेशी पर्यटकांना राजस्थानी मोजडी आकर्षित करताना दिसत आहे. राजस्थानी मोजडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिची पारंपरिक बनावट होय. राजस्थानातील स्थानिक कारागीर मोजडींवर रंगीबेरंगी धाग्यांनी सुंदर नक्षी तयार करत असतात. बाजारात २०० रुपयांपासून ते दोन हजार रूपयांपर्यंत किंमतीच्या मोजडय़ा उपलब्ध आहेत. शॉपिंगच्या निमित्ताने बाजारात आलेल्या नागरिकांना रस्त्यावरूनच दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेल्या विविध रंगीबेरंगी व आकर्षक डिझाइनमधील मोजडी आकर्षित करताना दिसतात.
काळानुरुप फॅशनमध्ये अमुलाग्र बदल होत गेले. त्याला मोजडीही अपवाद ठरली नाही. मोजडीमध्ये अनेक बदल होत गेले. मोजडीच्या या विविध अवतरांचा आणि रूपांचा घेतलेला हा वेध..
कोणत्या कपडय़ांवर वापराल मोजडी?
शेरवानी घातलेल्या तरुणांच्या सौंदर्यात मोजडी भर घालते. महिलाही साडीवर व तरुणी जीन्स व टॉपवर मोजडी वापरतात.
तरुण कुर्ता -पायजमा व शेरवानीवर तर तरुणी चुडीदार, सलवार कुर्ता, जीन्स व टॉपवर मोजडी वापरतात. त्यामुळे त्यांच्या पोशाख परीपूर्ण होऊन व्यक्तिमत्त्व अधिक रूबाबदार दिसते.
काही महत्त्वाच्या गोष्टी :
मोजडी खरेदी करताना काही गोष्टींचे भान बाळगावे लागते. मोजडी सैलसर असावी. काही दिवस मोजडी वापरल्यानंतर पायाला फोड येतात. खास मराठीत आपण त्याला चप्पल चावली, असे म्हणतो. त्यासाठी मोजडी ज्या ठिकाणाहून त्रास देत आहे, त्याजागी मेण घासावे. त्यामुळे मोजडी लागणार नाही.
* पांढरा कुर्ता-पायजम्यावर राखाडी व क्रीम रंगाची मोजडी एक वेगळा प्रयोग ठरु शकेल.
* सलवार-कुर्त्यांवर तर मोजडी घालणे विसरू नका.
*मोजडी विकत घेताना ती पायात घालून दुकानातच चालून पाहिले पाहिजे.
कुठे आणि किंमत..
ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठ, गावदेवी परिसरातील पादत्राणांची दुकाने, विवियाना मॉल, कोरम मॉल बरोबरच अनेक चर्मकारांच्या दुकानांमध्ये कोल्हापुरी चपला तयार करुन. ही पादत्राणे २०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे
मोजडीचे काही प्रकार
पारंपारिक चामडी मोजडी- पारंपारिक मोजडी पूर्णपणे मृत झालेल्या प्राण्याच्या चामडय़ापासून बनवली जाते. त्याचप्रमाणे सध्या बनावटी चामडय़ाच्याही मोजडय़ा बाजारात उपलब्ध आहेत. काही मोजडीवर नक्षीकाम केलेले असते, तर काही सर्वसाधारण पॉलीश केलेल्या असतात.
जोधपुरी मोजडी- जोधपुरी मोजडीचे वैशिष्टय़ म्हणजे, तिचे निमुळते टोकदार टोक. जोधपुरी प्रकारच्या मोजडीच्या पुढील आवरणास मध्यभागी सोनेरी किंवा चंदेरी रंगाची पट्टी लावलेली असते. आकर्षक टोकामुळे ही मोजडी सर्वाचे लक्ष वेधून घेते.
विणकाम केलेली मोजडी- सर्वसाधारण मोजडीला धाग्याची नक्षी करुन अधिक आकर्षक बनविण्याचा प्रयत्न कारागिरांनी केला आहे. अशाप्रकारच्या मोजडीमध्ये दोन प्रकार उपलब्ध आहेत. एक म्हणजे सर्वसाधारण मोजडी आणि दुसरी मोजडी म्हणजे फ्लिप फॉप मोजडी. फ्लिप फ्लॉप मोजडी ही साधारण चप्पलप्रमाणे असते. तिचा केवळ पुढचा भाग मोजडीसारखा दिसतो तर मागचा भाग चप्पलसारखा. अशा प्रकारच्या मोजडी दररोज वापरसाठी सर्वाधिक वापरल्या जातात.
स्टडेड मोजडी- अशा प्रकारच्या मोजडीमध्ये भरीव नक्षीकाम केलेले आपल्याला पहायला मिळते. रंगीबेरंगी हिरे, मण्यांचा वापर करुन या मोजडीला अधिक आकर्षक रुप देण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी केला आहे. विशेषत: तरुणी अशा प्रकारच्या मोजडी वापरतात. खास करुन लग्न समारंभासारख्या मोठय़ा कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या मोजडी दिसून येतात. तसेच महाविद्यालयीन तरुण जीन्स व कुर्ती अशा पेहराव्यांवर ही मोजडी घालतात.
हिल्स मोजडी- सामान्यत: मोजडी या पारंपारिक प्रकारामध्ये नक्षींचे नाविन्यपूर्ण काम आपल्याला पहायला मिळते. परंतू फॅशनच्या दुनियेत हाय हिल्स हा जणू पादत्राणांचा मुख्य प्रकार बनला आहे. सर्व प्रकाराच्या पादत्राणांमध्ये आता हिल्स लावून त्याला आधुनिक बनविण्याचा प्रयत्न होत आहे. कमी उंचीच्या तरुणींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. अनेक प्रकार बाजारांमध्ये उपलब्ध आहेत.